मुंबई : आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) हंगामापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्ससोबत ट्रेड केले आहे. या बहुचर्चित करारानुसार इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन लखनौच्या संघात दाखल होणार असून, तामिळनाडूचा डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्थ या व्यवहाराचा भाग असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही फ्रँचायझींमध्ये या खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत अंतिम सहमती झाली आहे. या करारानुसार अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे, तर सॅम करन लखनौच्या ताफ्यात सामील होईल. तसेच लखनौचा संघ फिरकीपटू एम. सिद्धार्थलाही या व्यवहारांतर्गत मुक्त करणार असून, याची केवळ औपचारिक घोषणा आणि कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी आहे.
नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या ३६ वर्षीय मोहम्मद शमीची आयपीएल २०२६ मधील कामगिरी साधारण राहिली होती, ज्यामध्ये त्याने १३ सामन्यांत १२ विकेट्स पटकावल्या होत्या. असे असले तरी, २०२४ पासून पॉवरप्लेमध्ये ८.७६ च्या किफायतशीर इकॉनॉमीने १४ विकेट्स घेण्याची त्याची क्षमता राजस्थानच्या गोलंदाजीसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. विशेषतः, जोफ्रा आर्चर आणि मोहम्मद शमी ही वेगवान गोलंदाजांची घातक जोडी आगामी हंगामात विरोधी संघाच्या फलंदाजांवर नक्कीच दबाव वाढवेल. मागील हंगामात आर्चरने राजस्थानच्या गोलंदाजीचे यशस्वी नेतृत्व केले होते, आता त्याला शमीच्या अनुभवाची भक्कम साथ मिळणार आहे.
सॅम करन, टॉम मुडी पुन्हा एकत्र
दुखापतीमुळे आयपीएलचा २०२६ चा हंगाम मुकलेला सॅम करन आता पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा आहे. लखनौचे क्रिकेट संचालक टॉम मुडी यांच्या मार्गदर्शनाखाली करनने यापूर्वी 'द हंड्रेड' आणि 'आयएलटी-२०' लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुडींच्याच नेतृत्वाखाली त्याने 'डेझर्ट वायपर्स' संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे लखनौच्या संघात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.


