मृत आईच्या २३ लाखांच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या मुलावर गुन्हा

वडिलांच्या परवानगीशिवाय दागिने सराफाला विकल्याचा आरोप; मडगाव पोलिसांत तक्रार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
16th November, 09:07 pm
मृत आईच्या २३ लाखांच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या मुलावर गुन्हा

मडगाव : दिवंगत पत्नीचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी वडिलांनी मुलाकडे विश्वासाने सोपवले होते. मात्र, मुलाने त्यांच्या परवानगीशिवाय हे दागिने सराफाला विकून २३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी सर्वेश नानोस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आके-बायश येथील बाबुराव नानोस्कर यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांनी २४ जुलै २०२६ पूर्वी दिवंगत पत्नीचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी मुलगा सर्वेश याच्याकडे दिले होते. मात्र, त्याने वडिलांना कोणतीही कल्पना न देता किंवा त्यांची परवानगी न घेता मडगाव येथील एका सराफाला दागिने विकल्याचा आरोप आहे.
विक्रीची रक्कम वैयक्तिक वापरासाठी खर्च
दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेले २३ लाख ५५ हजार रुपये वडिलांकडे जमा करण्याऐवजी संशयिताने स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याने वडिलांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे मडगाव पोलिसांनी संशयित सर्वेश नानोस्कर याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मडगाव पोलीस उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा