वाळपई : सत्तरी तालुक्यातील दाबे येथे एका विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विषारी फळे खाल्ल्यामुळे तिची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विवाहाला अडीच वर्षे झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. वाळपई पोलीसही तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, शिरोली येथील तरुणीचा अडीच वर्षांपूर्वी दाबे येथील युवकासोबत विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर अपत्यप्राप्ती न झाल्याने हे दाम्पत्य डॉक्टरांचा सल्ला घेत होते. घटनेच्या दिवशी सकाळीही ती पतीसोबत डॉक्टरांकडे गेली होती. त्यानंतर दोघे घरी परतले. दुपारी जेवण केल्यानंतर पती कामानिमित्त बाहेर गेला.
सायंकाळी सुमारे चार वाजता पती घरी परतला असता पत्नी खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्याने तिला तातडीने वाळपईच्या सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी गोमेकॉत नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. वाळपई पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपजिल्हाधिकाऱ्यांकडून होणार चौकशी
विवाहाला अडीच वर्षे झाल्यामुळे नियमानुसार या मृत्यू प्रकरणाची चौकशी सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. घटनेची परिस्थिती, उपलब्ध माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जाणार आहेत. विषारी फळांचे सेवन कोणत्या परिस्थितीत झाले आणि मृत्यूचे नेमके कारण काय, हे पोलीस तपास व उत्तरीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.


