पणजी : गोव्यातील एसआयआर प्रक्रियेनंतरची पहिली मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यात आली असून त्यात ३१ हजार ८१५ मतदारांची भर पडली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी ही माहिती दिली.
संजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सुमारे ३१,८१५ मतदारांची निव्वळ भर पडली आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या प्रक्रियेत सुमारे ४३,००० नवीन नावांचा समावेश करण्यात आला, तर सुमारे ११,५०० नावे वगळण्यात आली आहेत. या मसुदा यादीमध्ये एसआयआरद्वारे तयार केलेली मूळ यादी आणि त्यानंतरच्या पुरवणी याद्यांचा समावेश आहे. या यादीच्या प्रती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आल्या असून, त्या मतदान केंद्रांवर, तसेच बूथ लेव्हल एजंट आणि बूथ लेव्हल ऑफिसर यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘विशेष सारांश पुनरीक्षण’ प्रक्रियाही सुरू झाली आहे. १२ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत फॉर्म ६, ७ आणि ८ द्वारे दावे आणि हरकती सादर करता येतील. नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म ६, नावे वगळण्यासाठी किंवा हरकती नोंदवण्यासाठी फॉर्म ७ आणि तपशीलात दुरुस्ती, पत्त्यात बदल, मतदार ओळखपत्राची पुनर्निर्मिती किंवा अपंगत्वाची नोंद करण्यासाठी फॉर्म ८ वापरता येईल. या सर्व अर्जांवर २८ डिसेंबरपर्यंत निर्णय घेतले जातील आणि १ जानेवारी २०२७ ही अर्हता तारीख गृहीत धरून, अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०२७ रोजी प्रकाशित केली जाईल. संजय गोयल यांनी सांगितले की, ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.


