पिकळेवाडी-कुळे येथे सरकारी जागेवर सुरू असलेले चिरे उत्खनन.
फोंडा :
कुळे पंचायत क्षेत्रातील पिकळेवाडी येथे सरकारी जागेवर गेल्या सहा-सात महिन्यांपासून बेकायदेशीरपणे चिरे उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही खाण खात्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राजकीय पाठबळामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा दावाही स्थानिकांनी केला आहे.
पिकळेवाडीतील सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात चिरे उत्खनन सुरू असून, येथून दररोज १० ते १२ ट्रक चिऱ्यांची वाहतूक केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उत्खनन परिसरातील अनेक झाडांची कत्तल करण्यात आली असून, त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यापूर्वी खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्याचे दाखवले होते. मात्र, त्यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पुन्हा उत्खननाला वेग आला. स्थानिकांनी तक्रारी करूनही संबंधित अधिकारी गांभीर्याने दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या साहाय्याने बेकायदा चिरेखाणीचे चित्रीकरण करण्यात आले होते. या व्हिडिओत उत्खननाचे मोठे क्षेत्र दिसून आले. यासंबंधी खाण खात्याकडे तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. उलट, ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात खाण खात्याने कुळे पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनीही गुन्हा नोंद केला. दिवाळीत हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, आता तरी खाण खाते ठोस कारवाई करणार का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
चिरेखाणीबाबत खाण खात्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी वारंवार कारवाई करण्याचे नाटक केले. गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम चिरे उत्खनन सुरू आहे. यात काही लोक गुंतलेले असून, सरकारच्या आशीर्वादामुळेच हा प्रकार सुरू आहे.
- श्रीकांत च्यारी, धारबांदोडा
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
सोमवारी सकाळी बेकायदेशीर चिरेखाणीसंबंधी माहिती उघड झाल्यानंतर चिरेखाणीच्या मालकांची धावपळ उडाली. त्यानंतर काही जणांनी पत्रकारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर हे प्रकरण दडपण्यासाठी काही राजकीय व्यक्तींनीही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, संबंधित यंत्रणा याची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.


