पणजी: ग्राहकांना सेवा देण्यासाठी राज्य सहकारी बँक (The Goa State Co-operative Bank Ltd) विविध उपक्रम राबवत आहे. यानुसार काही दिवसांपूर्वीच मोबाईल बँकिंग ॲप सुरू करण्यात आले आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत बँकेसाठी स्वतंत्र आयएफएससी कोड, युपीआय, नेट बँकिंग सुरू केले जाईल. बँकेचा नेट एनपीए २.८० टक्क्यांवरून शून्य पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर यांनी सांगितले.
सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनंत चोडणकर, श्रीपाद परब, कृष्णा कुडणेकर व संचालक मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुर्टीकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दोन दिवसांपूर्वी बँकेच्या मोबाईल ॲपचे अनावरण केले आहे. सर्व ग्राहक, देवस्थान समिती, सहकारी संस्थांना या सुविधेचा फायदा होणार आहे. यामुळे विशेष करून युवा वर्ग बँकेकडे आकर्षित होईल अशी आम्हाला खात्री आहे. काही वर्षांपूर्वी बँकेची परिस्थिती बिकट होती. आरबीआयने बँकेवर बंधने घालण्याची तयारी केली होती. मात्र संचालक मंडळांने आता परिश्रम करून बँकेची स्थिती सुधारली. यामुळे आज बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे.
ते म्हणाले, मोबाईल ॲप बँकिंगसाठी आम्ही मागील दीड वर्षे प्रयत्न करत होतो. याबाबत आरबीआयकडे प्रस्ताव पाठवला होता. आम्ही आरबीआयने घातलेले सर्व निकष पूर्ण केल्याने आम्हाला आता मोबाईल ॲप सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.
हा बँकेच्या ६३ वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. मोबाईल ॲपद्वारे पैसे पाठवणे, घेणे सहज शक्य होणार आहे. सध्या आम्ही येस बँकेचा आयएफएससी कोड वापरत आहोत. बँकेच्या स्वतंत्र कोडसाठी देखील आरबीआय कडे प्रस्ताव पाठवला आहे. मागील तीन वर्षे बँक नफ्यात आहे. शेवटच्या तिमाहीत बँकेला ९.२२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
बँक मजबूत स्थितीत
आरबीआयने मोबाईल ॲपला परवानगी देणे हे बँक मजबूत स्थितीत आहे हे दर्शवते. ३१ मार्च २०२६ अखेरीस बँकेचा सीआरएआर १२.०५ टक्के होता. आरबीआयनुसार याची मर्यादा १० टक्के पेक्षा कमी असू नये. बँकेचा जीएनपीए ४.७९ टक्के आहे. हे देखील आरबीआयच्या मर्यादेत आहे असे पांडुरंग कुर्टीकर यांनी सांगितले.


