ओंकार’च्या मागावर गेलेल्यांना गांजिल माशांचा मार

सावंतवाडीतील कोनशी जंगलात 'ओंकार' हत्तीचा माग काढणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर गांजिल माशांनी हल्ला केल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
ओंकार’च्या मागावर गेलेल्यांना गांजिल माशांचा मार

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील जंगलात 'ओंकार' हत्तीचा माग काढणाऱ्या वन विभागाच्या पथकावर गांजिल माशांनी (भुंग्यांनी) अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यात वन विभागाचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, वेळेवर मिळालेल्या उपचारानंतर दोघांचीही प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 'ओंकार' हत्ती ओटवणे गावातून मार्गक्रमण करत रात्री असनिये गावात दाखल झाला होता. त्यानंतर दाणोली-बांदा जिल्हा मार्ग ओलांडून तो भालावल व तांबोळी मार्गे पुन्हा असनिये परिसरात पोहोचला. तिथे रात्रभर मुक्काम केल्यानंतर गुरुवारी सकाळी त्याने पुन्हा मागे वळून दुपारच्या सुमारास कोनशी येथील माऊली मंदिर परिसर गाठला. हत्ती जंगलातून पुन्हा असनियेच्या दिशेने जात असताना त्याचा पाय जमिनीतील गांजिल माशांच्या बिळावर पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे बिळातून हजारो गांजिल माशांनी एकाच वेळी बाहेर पडून हत्तीवर हल्ला चढवला.

हत्तीच्या अगदी जवळून त्याचा मागोवा घेणारे वन कर्मचारीही या माशांच्या तावडीत सापडले. अवघ्या काही क्षणांत हजारो माशांनी संपूर्ण परिसर व्यापल्याने वन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. स्वतःचा बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणाकडे पळ काढला, मात्र या गडबडीत दोन कर्मचाऱ्यांना माशांनी गंभीर चावा घेतल्याने ते जखमी झाले.

दरम्यान, या घटनेनंतर बांदा वनपालांनी दिलेल्या माहितीनुसार 'ओंकार' हत्ती सध्या जंगलातच थांबून आहे. गांजिल माशांनी हत्तीवरही हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, वन विभाग हत्तीच्या प्रकृतीवर आणि त्याच्या हालचालींवर ड्रोन तसेच पथकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे आता वन कर्मचाऱ्यांना हत्तीच्या सुरक्षेसोबतच जंगलातील अशा नैसर्गिक संकटांपासूनही सतर्क राहावे लागणार आहे.


हेही वाचा
सर्व पहा