मंत्री आमोणकर यांच्याकडे हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर खात्याचा कार्यभार

नवे मंत्री संकल्प आमोणकर यांच्याकडे हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयरखात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, सामान्य प्रशासन खात्याने याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
36 mins ago
मंत्री आमोणकर यांच्याकडे हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर खात्याचा कार्यभार

पणजी : राज्य मंत्रिमंडळात शनिवारी शपथ घेऊन सहभागी झालेले मंत्री संकल्प आमोणकर यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. यामध्ये कृषी, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार तसेच हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर या खात्यांचा समावेश आहे. या खातेवाटपाची अधिकृत अधिसूचना ८ नोव्हेंबर रोजी सामान्य प्रशासन खात्याने जारी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. आमोणकर यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या खात्यांमध्ये कृषी विभागाला विशेष महत्त्व आहे. राज्यातील शेतकरी, कृषी उत्पादन, शेतीसाठीच्या विविध योजना तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी या विभागामार्फत पार पाडली जाते. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची मोठी जबाबदारी आता मंत्री आमोणकर यांच्यावर राहणार आहे. यापूर्वी हे खाते फोंडाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्याकडे होते, तर त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडे ताबा होता. आता ही जबाबदारी संकल्प आमोणकर यांच्याकडे आली आहे.

याचबरोबर, सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाची जबाबदारीही त्यांना देण्यात आली आहे. अन्नधान्याचा पुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच ग्राहकांच्या हिताशी संबंधित बाबींवर या विभागाचे कामकाज चालते. त्यामुळे सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या या खात्याचे महत्त्व मोठे आहे. तसेच राज्यातील पारंपरिक हस्तकला, कारागीर आणि काथ्या क्षेत्राला चालना देण्यासाठी हस्तकला, वस्त्रोद्योग आणि कॉयर खातेही त्यांच्या कार्यक्षेत्रात आले आहे.

तीन महिन्यांच्या या कार्यकाळात शेतकरी, ग्राहक आणि पारंपरिक कारागीर यांच्याशी थेट संबंध असलेल्या या विभागांमध्ये मंत्री आमोणकर काय निर्णय घेतात आणि प्रशासनाला कशी दिशा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा