पणजी: आमदार संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांनी शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना मंत्रिपदाची, गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्यासह मुख्य सचिव व्ही कांडावेळू उपस्थित होते. कार्यक्रमास मंत्री, आमदार यांच्यासह आमोणकर यांचे कुटुंबीय तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमोणकर यांना देण्यात येणारी खाती लवकरच जाहीर केली जाणार आहेत. शपथ विधी नंतर अमोणकर यांनी सर्वांचे आभार मानले.
आमोणकर यांनी सांगितले की, मला मंत्री पदासाठी पुरेसा कालावधी मिळाला आहे. या कालावधीत मला जनतेची तसेच संपूर्ण गोव्याची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकसित गोवा २०३७ चे स्वप्न पाहिले आहे. मंत्री म्हणून त्यामध्ये योगदान देण्याची संधी मला मिळाली आहे. भाजप सरकारने राज्यात वेगाने विकास कामे केली आहेत. ती क्षमता आमच्यामध्ये आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत मोठे पूल उभारले आहेत.
ते म्हणाले, याच पद्धतीने मी मला मिळालेल्या कालावधीत अधिकाधिक विकासकामे करण्याचा प्रयत्न करणार आहे. मंत्री म्हणून मला सरकारचा तसेच सर्व जनतेचा पाठिंबा मिळेल अशी खात्री आहे. पक्षाने आतापर्यंत माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी पूर्ण केली आहे. या कामाच्या जोरावरच आज मला मंत्रिपद मिळाले आहे. देवाचा आणि जनतेचा आशीर्वाद माझ्यावर कायम राहील. मुख्यमंत्री जे खाते देतील ते मला मान्य असेल. कोणतेही खाते मिळाले तरी काम करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी संकल्प आमोणकर यांचे अभिनंदन केले. आमोणकर आपला मतदारसंघ तसेच संपूर्ण गोव्याची सेवा करण्यास सक्षम आहेत, असे त्यांनी सांगितले. आमोणकर यांच्या पत्नी श्रद्धा यांनी देवाचे आभार मानले. निवडणुकीला तीन महिने शिल्लक असले तरी संकल्प जनतेची सर्व कामे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकीय प्रवासातून वेगळी ओळख
काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केलेल्या आमोणकर यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद नाईक यांचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी १,९४१ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यानंतर सप्टेंबर, २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या इतर सात आमदारांसोबत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गोव्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.


