म्हापसा : घरी अन्नपदार्थ तयार करून त्याची उघड्यावर, हातगाड्यांवर किंवा वाहनांतून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (Directorate of Food and Drugs Administration (FDA)) कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.
घरगुती अन्न व्यवसाय करणाऱ्यांनी स्वयंपाकाची जागा आणि विक्री केंद्र या दोन्हीसाठी 'एफएसएसएआय' नोंदणी करून स्वच्छतेचे नियम पाळावेत, असा सल्ला नुकताच प्रशासनाने दिला होता. यासाठी दिलेली दोन आठवड्यांची मुदत संपताच एफडीएने थेट तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
कळंगुट बीच रोड परिसरात आज सकाळी ६ ते १० या वेळेत धडक कारवाई करत १३ नियमबाह्य विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवण्याची 'स्टॉप नोटीस' बजावली. तपासणीदरम्यान या विक्रेत्यांचे स्वयंपाकघर कळंगुट परिसरातील एका झोपडपट्टी भागात असल्याचे उघडकीस आले. तिथे अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि दूषित पाण्याचा वापर करून इडली-सांबार, मेदूवडा, डोसा आणि पोहे यांसारखे नाश्त्याचे पदार्थ तयार केले जात होते.
हे पदार्थ सकाळी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना विकले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक दुकाने आणि कॅफे चालकांनी अन्नपदार्थ कुठून येतात याची कोणतीही शहानिशा न करता सकाळच्या वेळी हे स्टॉल्स चालवण्यासाठी जागा भाड्याने दिल्याचेही समोर आले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या कलम ३१ अंतर्गत संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. निवासी जागेत विनापरवाना व अनधिकृत व्यावसायिक कामांसाठी जागा भाड्याने देणाऱ्या घरमालकांनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
घरगुती अन्नपदार्थांची जाहिरात करणाऱ्यांवर नजर
उत्तर गोवा एफडीएच्या पथकाने संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली. येत्या काळात पणजी, बार्देश आणि सर्व समुद्रकिनारी भागांत अशा अचानक तपासण्या सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून घरगुती अन्नपदार्थांची जाहिरात करणाऱ्या विक्रेत्यांवरही एफडीएची करडी नजर आहे. परवाना नसलेल्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ६९ नुसार थेट दंड आणि कडक कारवाई केली जाणार आहे.


