पणजी : गोव्यात आज रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला (High Court of Bombay at Goa) दिली आहे. त्यानुसार, रात्री १२ वाजल्यानंतर राज्यात संगीत आणि डीजे वाजविण्यास बंदी असेल.
म्हापसा येथील जोस लोबो आणि अँथनी लोबो यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी सरकारने ही माहिती न्यायालयात दिली.

याप्रकरणी न्यायाधीश अमित जामसंडेकर यांच्या न्यायालयात शनिवार ७ नोव्हेंबर रोजी विशेष सुनावणी झाली असता, ऍडव्हाेकेट जनरल देविदास पांगम यांनी वरील माहिती दिली. याची दखल न्यायालयाने घेतली.

दरम्यान, गोव्यात शेकडोच्या संख्येने नरकासूर (Narkasur) केले जातात. निवडणूक असल्यामुळे अनेक राजकीय नेतेही नरकासूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणांत निधी देतात. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नरकासूर साकारले जातात व स्पर्धाही भरवल्या जातात.


