पणजी : मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा दिवाळीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शनिवारी मंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. माजी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर वर्षभर रिक्त असलेले मंत्रिपद भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता लोकभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडेल.
शपथविधीबाबतची अधिकृत माहिती शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सरकारकडून देण्यात आली नव्हती. मात्र, दिवाळीच्या आदल्या दिवशी एका मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश करणे हा राजकीय वर्तुळात धक्कादायक निर्णय मानला जात आहे. संकल्प आमोणकर हे सावंत सरकारमधील बारावे मंत्री ठरतील. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्याने, मंत्री म्हणून काम करण्यासाठी त्यांना केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे.
संकल्प आमोणकर हे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या इतर आठ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. सूत्रांनुसार, त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. आता निवडणुका जवळ आल्याने मुख्यमंत्र्यांनी या आश्वासनाची पूर्तता केल्याचे मानले जात आहे.
या शपथविधीबाबत प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे, मात्र मला अद्याप याबाबत काहीच अधिकृत माहिती नाही.
माजी मुख्यमंत्री आणि सावंत सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले ज्येष्ठ नेते रवी नाईक यांचे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळातील ही एक जागा रिक्त झाली होती. या मंत्रिपदासाठी संकल्प आमोणकर, मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. फोंडा पोटनिवडणुकीनंतर ही रिक्त जागा भरण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
फोंडा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होऊन त्याची संपूर्ण प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र, विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपण्यास अत्यंत कमी कालावधी शिल्लक असल्याचे कारण देत, मुंबई उच्च न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्द केली. त्यामुळे फोंडा मतदारसंघातील आमदारकीचे पद सध्या रिक्तच आहे. या घडामोडींनंतरही रिक्त असलेल्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरूच होती आणि अखेर आमोणकर यांच्या रूपाने ही जागा भरली जात आहे.


