झाडावरून पडून एकाचा मृत्यू; निधनाची बातमी ऐकून महिलेचाही मृत्यू

दोघांच्या मृत्यूने नागवे गाव शोकसागरात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
07th November, 11:28 pm
झाडावरून पडून एकाचा मृत्यू; निधनाची बातमी ऐकून महिलेचाही मृत्यू

वाळपई : सत्तरी तालुक्यातील माऊस ग्रामपंचायत क्षेत्रातील नागवे गावावर शनिवारी दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील भिकू बाजारी (वय ३९) यांचा अडवई येथे नारळाचे झाड कापताना नियंत्रण सुटून खाली पडल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर शेजारील महिला सगीत झोरे यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका आला. उपचार सुरू असतानाच त्यांचेही निधन झाले.

भिकू बाजारी हे शनिवारी आडवई-सत्तरी येथील एका व्यक्तीच्या मालकीचे नारळाचे झाड कापण्यासाठी गेले होते. झाड कापण्याचे काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि नियंत्रण सुटल्याने ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने वाळपई येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

भिकू बाजारी यांच्या निधनाची बातमी नागवे गावात पोहोचताच गावात एकच खळबळ उडाली. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, भिकू यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या सगीत झोरे (३६) यांनाही या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला. त्या शोक व्यक्त करीत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्यांना वाळपई येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या दुर्घटनेप्रकरणी वाळपई पोलिसांनी पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक विदेश पिळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा
सर्व पहा