दक्षिण गोव्यात रस्ते अपघातांत १२ टक्क्यांनी वाढ

२९ टक्के स्वयंअपघात : जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत १,१४२ अपघातांची नोंद

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
05th November, 11:25 pm
दक्षिण गोव्यात रस्ते अपघातांत १२ टक्क्यांनी वाढ

मडगाव : दक्षिण गोव्यात यावर्षी रस्ते अपघातांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, प्राणघातक अपघातांमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत दक्षिण गोव्यात एकूण १,१४२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १,०१९ अपघात घडले होते.

दक्षिण गोवा वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. एकीकडे जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी झाले असले, तरी किरकोळ आणि गंभीर अपघातांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. गंभीर दुखापत झालेल्यांची संख्या गेल्यावर्षी १६ होती, ती यंदा वाढून २१ झाली आहे.

या आकडेवारीतील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे, दक्षिण गोव्यातील एकूण रस्ते अपघातांपैकी सुमारे २९ टक्के अपघात हे स्वयंअपघात आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विजेचे खांब, रस्त्यावरील दुभाजक किंवा अन्य अडथळ्यांना धडक बसून हे अपघात घडतात.

स्वयंअपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असून, अनेकांना डोक्याला गंभीर दुखापत होत असल्याचे दिसून आले आहे. हेल्मेटचा वापर न करणे तसेच वाहनावरील नियंत्रण सुटणे ही अपघातांची तीव्रता वाढविणारी प्रमुख कारणे ठरत आहेत.

वाहतूक नियमांचे पालन करा : प्रभुदेसाई

रस्ते अपघातांच्या एकूण संख्येत झालेली वाढ लक्षात घेता, केवळ प्राणघातक अपघात कमी होणे पुरेसे नसल्याचे चित्र आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा नियमित वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्याकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा