म्हापसा : रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात जुने गोवा पोलिसांनी अटक केलेला निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि संशयित महिलेला पॉक्सो न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दोघाही संशयितांना गुरुवार, दि. ५ रोजी मेरशी येथील पोक्सो न्यायालयात पोलीस कोठडीसाठी हजर केले. याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात केली. या पोलीस कोठडीच्या विनंतीला संशयित पक्षाच्यावतीने आक्षेप घेण्यात आला. या हरकत अर्जावर युक्तिवादासाठी न्यायालयाने शुक्रवारी ६ रोजी सुनावणी निश्चित केली. तोपर्यंत एका दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दोघाही संशयितांना सुनावली.
दरम्यान, जुने गोवे पोलिसांनी निलंबित पोलीस निरीक्षक विकाय देयकर समवेत सदर संशयित महिलेला बुधवारी सायंकाळी अटक केली होती. मुरगाव तालुक्यातील पीडित फिर्यादी मुलीचे संशयित विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या कार्यालयात लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ७५, १२७, ४९ व ६१(२) आणि पोक्सो कायदा कलम १० व १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
दोन्ही संशयितांच्या जबाबात तफावत आणि विसंगती आढळून आली. प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे देण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी तपासा दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यात संशयिताचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे दिसून आले. त्यामुळे संशयित बाहेर राहिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची तसेच पुराव्यांशी छेडछाड करण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
पीडितेवर गोमेकॉत उपचार सुरू
पीडित अल्पवयीन मुलीची अपना घरमध्ये प्रकृती बिघडल्यामुळे तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या तिच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंजली धुळापकर या करत आहेत.


