मडगाव : चांदर येथील अरुंद वळणावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात शेल्डे- केपे येथील समद कादर बादशहा सुरंगी (१९) या युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समद हा शेल्डे येथून चांदरच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात समद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच मायना कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सागर मांद्रेकर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, चांदर येथील हे वळण अरुंद असून, यापूर्वीही या ठिकाणी अपघात घडले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे रुंदीकरण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


