खोर्ली पंचायतीचे पंच केरकर दाम्पत्याला न्यायालयाचा दिलासा

अपात्रतेचा गटविकास अधिकार्‍यांचा आदेश रद्द

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
07th November, 11:21 pm
खोर्ली पंचायतीचे पंच केरकर दाम्पत्याला न्यायालयाचा दिलासा

म्हापसा : खोर्ली, तिसवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि पंच सुप्रिया केरकर यांना अपात्र ठरवणारा गटविकास अधिकार्‍यांचा (बीडीओ) आदेश म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा अतिरिक्त न्यायालयाने (फास्ट ट्रॅक) रद्द ठरवला आहे. याबाबतचा निवाडा न्यायाधिश रिना फर्नांडिस यांनी दिला आहे.

पंच सदस्य सुप्रिया केरकर यांनी त्यांच्या मालकीच्या दोन बांधकामांना घर क्रमांक आणि पाणी-वीज जोडणीसाठी ना हरकत दाखला मिळण्यासाठी पंचायतीकडे अर्ज केले होते. पंचायत मंडळाच्या २९ डिसेंबर २०२३ रोजीच्या बैठकीत याबाबतीत ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांमध्ये दोघांचा वैयक्तिक आर्थिक फायदा गुंतलेला असल्याने त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत पुर्सो धुळापकर आणि होणू धुळापकर यांनी तक्रार केली होती. त्यानुसार तिसवाडीच्या गटविकास अधिकार्‍यांनी दोघांनाही पंच सदस्य म्हणून अपात्र घोषित केले होते. याविरोधात केरकर दाम्पत्याने न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवत स्पष्ट केले की, संबंधित बांधकामांमध्ये केरकर दाम्पत्याचा आर्थिक हितसंबंध नक्कीच होता. परंतु, त्या ठरावांवर चर्चा किंवा मतदान सुरू असताना दोघेही सभागृहाबाहेर निघून गेले होते. बैठकीच्या इतिवृत्तात तशी नोंद असून तत्कालीन सरपंचांच्या साक्षीवरूनही ते सिद्ध झाले. ते चर्चा किंवा मतदानात सहभागी झाल्याचा कोणताही ठोस पुरावा तक्रारदार देऊ शकले नाहीत. त्यामुळे अपात्रतेचा आदेश बेकायदेशीर ठरवून न्यायालयाने तो पूर्णपणे रद्दबातल केला.

दरम्यान, तिसवाडीच्या गटविकास अधिकार्‍यांनी प्रथम ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आदेश जारी करून गोरखनाथ केरकर आणि सुप्रिया केरकर यांना पंचायतीचे सदस्य म्हणून अपात्र घोषित केले होते. परंतु म्हापसा न्यायालयाने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी हा आदेश बाजूला ठेवून दोन्ही बाजूंना पुरावे सादर करण्याची संधी देत प्रकरण नव्याने सुनावणीसाठी पुन्हा गटविकास अधिकार्‍यांकडे पाठवले होते.

नव्याने पुरावे नोंदवून सुनावणी पूर्ण केल्यानंतर, गटविकास अधिकार्‍यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम निकाल दिला. या आदेशानुसार दोघांनाही गोवा पंचायत राज कायद्याच्या कलम १२ (१)(ड) व ५५ (४) अंतर्गत तत्काळ प्रभावाने अपात्र ठरवण्यात आले होते.

अपात्रतेच्या या आदेशाला केरकर दाम्पत्याने २६ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यावर सुनावणी होऊन शनिवारी ७ नोव्हेंबर रोजी, जिल्हा न्यायालयाने गटविकास अधिकार्‍यांचा हा आदेश रद्दबातल ठरवत दोघांनाही मोठा दिलासा दिला आहे.

केरकर दाम्पत्याचा पुनरीक्षण अर्ज दाखल

केरकर दाम्पत्याने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत पुर्सो धुळापकर आणि होणू धुळापकर यांनी तक्रार केली होती. त्यानुसार तिसवाडीच्या गटविकास अधिकार्‍यांनी दोघांनाही पंच सदस्य म्हणून अपात्र घोषित केले होते. याविरोधात केरकर दाम्पत्याने न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला होता. 

हेही वाचा
सर्व पहा