कामगार खात्याच्या सर्व सेवा येणार एका पोर्टलवर

नोंदणी, परवाने, तक्रारी, तपासण्या होणार डिजिटल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
07th November, 11:11 pm
कामगार खात्याच्या सर्व सेवा येणार एका पोर्टलवर

पणजी : कामगार खात्याच्या विविध सेवा एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘कामगार मित्र’ हे पोर्टल सुरू करण्याची तयारी केली आहे. या माध्यमातून कामगार आणि आस्थापनांची नोंदणी, परवाने, तक्रारी, तपासण्या तसेच खात्याचे इतर व्यवहार डिजिटल करण्यात येणार आहेत.
या पोर्टलची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खात्याने निविदा मागवल्या आहेत. कामगार, नियोक्ते, आस्थापना, कामगार संघटना आणि खात्याचे अधिकारी यांना एकाच व्यासपीठावर सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्रस्तावित पोर्टलवर कामगार आणि आस्थापनांची ऑनलाइन नोंदणी, परवान्यांसाठी अर्ज, नूतनीकरण, बदल तसेच कायद्यानुसार आवश्यक अहवाल सादर करता येतील. तक्रारी नोंदवण्याबरोबरच त्यांच्या सद्यस्थितीची माहितीही ऑनलाईन मिळणार आहे. तपासण्यांचे वेळापत्रक, अहवाल, नोटिसा, सुनावण्या आणि डिजिटल स्वाक्षरी असलेले आदेशही पोर्टलवर उपलब्ध होतील. अर्जांच्या प्रगतीबाबत एसएमएस आणि ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल.
पोर्टलची ईपीएफओ, ईएसआयसी, एमसीए-२१ आणि पॅन पडताळणी यंत्रणांशी जोडणी करण्याचे प्रस्तावित आहे. आधार आधारित पडताळणीची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. तसेच बहुभाषिक सुविधा, डेस्कटॉप, मोबाईल आणि टॅब्लेटवर पोर्टल वापरण्याची सोय असणार आहे.
निविदेनुसार, या प्रकल्पाचा प्रारंभीचा कंत्राट कालावधी ३६ महिन्यांचा असेल. त्यापैकी सात महिने पोर्टलच्या विकासासाठी, तर २९ महिने संचालन आणि देखभालीसाठी असतील. खात्याच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड आणि व्यवस्थापन माहिती प्रणालीही विकसित केली जाणार आहे. सध्या हा प्रकल्प निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात असून, पोर्टल अद्याप कार्यान्वित झालेले नाही.
आस्थापनांना मिळणार स्वतंत्र ओळख क्रमांक
या पोर्टलचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक आस्थापनाला स्वतंत्र ओळख क्रमांक (यूआयडी) देण्यात येणार आहे. विविध कामगार कायद्यांखाली नोंदणीकृत आस्थापनांची एकाच क्रमांकाद्वारे ओळख पटवता येईल. त्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणांकडे नोंदणीची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होईल.                   

हेही वाचा
सर्व पहा