मडगाव: नावेली येथील फुर्तादो पेट्रोल पंपाजवळ असलेल्या गोदामातून सुमारे २,५१४ मीटर लांबीची ३३ केव्ही विजेची केबल चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी एका टेम्पोचालकाला अटक केली आहे. सत्य गोगरे (रा. खारेबांध, मडगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नावेली येथील फुर्तादो पेट्रोल पंपानजीक 'यश इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स' (आगशी, तिसवाडी) यांचे गोदाम आहे. संशयित सत्य गोगरे याने स्वतःचा टेम्पो घेऊन गोदामात प्रवेश केला आणि तेथील ३३ केव्ही क्षमतेची सुमारे २,५१४ मीटर लांबीची विजेची केबल चोरून नेल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी कंपनीचे साईट सुपरवायझर अजय कुमार (सध्या रा. वेरोडा-कुंकळ्ळी, मूळ रा. जयपूर, राजस्थान) यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित सत्य गोगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असून, पोलीस उपनिरीक्षक समीर गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


