एकोशी-पोंबुर्फामध्ये दारूच्या नशेत कार चालकाचा धुमाकूळ; आठ दुचाकींना धडक

चार दुचाकीस्वार गंभीर जखमी, संशयित ताब्यात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
एकोशी-पोंबुर्फामध्ये दारूच्या नशेत कार चालकाचा धुमाकूळ; आठ दुचाकींना धडक

दिवाळीच्या पुर्वसंध्येला एका एका बाजूला राज्यात नरकासुरांचा गोंगाट सुरू असतानाच एकोशी- पोंबुर्फा परिसरात दारूच्या नशेत बेदरकारपणे कार चालवणाऱ्या चालकाने तब्बल आठ दुचाकींना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित कारचालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता. त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना एकापाठोपाठ धडक दिली. या अपघातात आठ दुचाकींचे नुकसान झाले तर चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याच्या गंभीर धोक्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

*नशेत वाहने न चालवण्याचे आवाहन

यापूर्वी दारूच्या नशेत वाहन चालवून झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत तर कित्येकांना जायबंदी व्हावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर नशेत वाहने न चालवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच इतरांच्या जीवाची खबरदारी घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांबरोबरच सर्वच स्तरावरून होऊ लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा