नवी दिल्ली: दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश आणि उत्सवाचा उत्साह एका कुटुंबासाठी कायमचा अंधकारमय ठरल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील नरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव कॉलनी येथे फटाके उडवत असताना घडलेल्या एका भीषण अपघातात अवघ्या १० वर्षांच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. फटाके फोडताना एक रॉकेट आकाशात जाण्याऐवजी थेट मुलाच्या पोटावर जाऊन आदळले, यात तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत मोठा गदारोळ केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर सर्व कुटुंबीय घराबाहेर फटाके फोडण्याचा आनंद घेत होते. यावेळी १० वर्षांचा मुलगा देखील इतर मुलांसोबत फटाके उडवत होता. एक पेटवलेला रॉकेट सरळ आकाशात जाण्याऐवजी अचानक दिशा भरकटला आणि वेगाने येऊन थेट मुलाच्या पोटाला जाऊन लागला. रॉकेटच्या तीव्र स्फोटामुळे आणि धक्क्यामुळे मुलगा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि अत्यंत गंभीर जखमी झाला.
दुर्घटना घडताच कुटुंबीयांनी मुलाला तात्काळ रक्ताळलेल्या अवस्थेत नरेला येथील राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या धक्कादायक बातमीने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार न केल्यामुळेच मुलाचा जीव गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच घटनास्थळी पोहोचलेल्या वडिलांची प्रकृतीही प्रचंड खालावली असून त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
काही क्षणांपूर्वी ज्या घरात दिवाळीचा सण हसत-खेळत साजरा होत होता, तिथे आता आक्रोशाचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मृत बालकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.


