मुंबई : कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना औषधांच्या प्रचंड खर्चाचाही सामना करावा लागतो. मात्र, आता या आर्थिक ओझ्यातून मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या १३७ अत्यावश्यक औषधांच्या व्यापारातील नफ्याला मर्यादा घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक महागड्या औषधांच्या किमतीत मोठी घट झाली आहे. ४० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे औषध आता अवघ्या ३ हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे. औषधांचे सुधारित दर आज ९ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्करोगाच्या उपचारांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (एनपीपीए) (National Pharmaceutical Pricing Authority NPPA) घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची वार्षिक सुमारे ३,५०२.३१ कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे.
६०० हून अधिक ब्रँडच्या किमतीत मोठी घट
रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील एनपीपीएने हा निर्णय जाहीर केला आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या तज्ज्ञ समितीने १७ ऑक्टोबर रोजी केलेल्या शिफारशीनंतर औषधांच्या व्यापारातील नफ्याला मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, ७६ प्रमुख औषध कंपन्यांनी १२१ औषधांशी संबंधित १,२२५ घटकांसाठी सुधारित कमाल किरकोळ विक्री किमती सादर केल्या आहेत. एकूण १,०३१ औषधी घटकांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ६०० हून अधिक ब्रँडच्या किमती ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाल्या आहेत. काही औषधांच्या किमतीत तर तब्बल ९६.४५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
कोणते औषध किती स्वस्त झाले?
स्तन, प्रोस्टेट, फुफ्फुस आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे.
पालबोप्रो (स्तनाचा कर्करोग) : आरपीजी लाइफ सायन्सेसच्या या औषधाची किंमत ४०,४२१.३३ रुपयांवरून थेट २,७२० रुपयांवर आली आहे.
अबीरॉन (प्रोस्टेटचा कर्करोग) : अर्व्हिनकेअर फार्माच्या या औषधाची किंमत ४१,२५० रुपयांवरून ३,२१८.२३ रुपये झाली आहे.
ब्रिक्सटा (फुफ्फुस व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) : झायडस लाइफसायन्सेसच्या या इंजेक्शनची किंमत २५,९९५ रुपयांवरून ३,३१८ रुपयांवर आली आहे.
डेनोस्टिओरेल : रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या या औषधाची किंमत २४,९५५ रुपयांवरून ६,२४० रुपये झाली आहे.
लुपीहेर २ : ल्युपिन लिमिटेडच्या या इंजेक्शनची किंमत ८३,५२० रुपयांवरून ३७,३५८.३० रुपये झाली आहे.
रुग्णांना जुन्या दराने औषधे विकल्यास कारवाई
औषधांच्या किमती कमी करण्याबरोबरच त्याचा प्रत्यक्ष फायदा रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकारने औषध विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्व मेडिकल स्टोअर्स आणि रुग्णालयांना सुधारित औषध दरांची यादी माहिती फलकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जुन्या दराने औषधांची विक्री होऊ नये, यासाठी राज्यांच्या औषध प्रशासन विभागांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून रुग्णांकडून अधिक पैसे आकारले जात नाहीत ना, याची तपासणी केली जाणार आहे.
भविष्यातील नवीन औषधांनाही लागू होणार नियम
कर्करोगावरील उपचारांसाठी भविष्यात भारतात दाखल होणाऱ्या आणखी १० ते १५ नवीन औषधांनाही हीच व्यापार नफा मर्यादा लागू होणार आहे. त्यामुळे आगामी काळातही कर्करोगाच्या उपचारांचा खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.


