भूतानमध्ये हिमनदीचा तलाव फुटला; आसाम, पश्चिम बंगालला महापुराचा धोका!

पश्चिम बंगालमध्ये १० हजारांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर; आसाममधील धुबरी, कोक्राझार जिल्ह्यांवर प्रशासनाची नजर : भूतानमधील गासा जिल्ह्यातील शिंटाफू (शिंटाफू/सिंटाफू) हिमनदी तलाव फुटल्याने भारतातील आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
भूतानमध्ये हिमनदीचा तलाव फुटला; आसाम, पश्चिम बंगालला महापुराचा धोका!

गुवाहाटी : भूतानमधील गासा जिल्ह्यातील शिंटाफू (शिंटाफू/सिंटाफू) हिमनदी तलाव फुटल्याने भारतातील आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. (Bhutan Glaciar Lake Burst: Flood Alert in Assam, and Bengal)  या घटनेनंतर दोन्ही राज्यांतील नदीकाठच्या आणि सखल भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन पश्चिम बंगालमधील अलिपुरद्वार जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर आसाममधील धुबरी आणि कोक्राझार जिल्ह्यांतील संवेदनशील भागांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

भारतीय यंत्रणांकडून विशेष सतर्कतेचा इशारा

भूतानमधील घटनेची माहिती मिळताच भारतीय दूतावासाने संबंधित यंत्रणांना सतर्क केले. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि केंद्रीय जल आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी विशेष पूरविषयक सूचना जारी केली. तलावातून आलेले पुराचे पाणी सहा ते आठ तासांत भारत-भूतान सीमेपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे पश्चिम बंगालमधील अलिपुरद्वार आणि आसाममधील धुबरी जिल्ह्याला विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

पश्चिम बंगालमध्ये १० हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी

पश्चिम बंगालमध्ये संकोश नदीप्रणालीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलिपुरद्वार जिल्ह्यातील सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. त्यापैकी चार ते पाच हजार नागरिकांना शाळांच्या इमारतींसह तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. तर सहा हजारांहून अधिक नागरिकांना अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात

कूचबिहार जिल्ह्यातील तुफानगंज आणि बॉक्सिरहाटसह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच जलपायगुडी, कूचबिहार आणि दार्जिलिंगच्या डोंगराळ भागांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा
सर्व पहा