जोधपूर : सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असले म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीतही भरघोस मते मिळतातच असे नाही, याचा प्रत्यय राजस्थानमध्ये आला आहे. जोधपूर जिल्ह्यातील ओसियां तालुक्यातील इंडोन की ढाणी-द्वितीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रसिद्ध ज्योतिषी आणि यूट्यूबर ओमप्रकाश बिश्नोई यांना अवघी ३३ मते मिळाली. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर त्यांचे तब्बल २१ लाखांहून अधिक चाहते आहेत. (Omprakash Bishnoi is followed by over 21 lakh people on social media, he got only 33 votes in his own village. The village has about 1,600 voters.)
ओमप्रकाश बिश्नोई हे चेहरा पाहून भविष्य सांगण्यासाठी आणि ज्योतिषविषयक व्हिडिओंसाठी लोकप्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे १४ लाख फॉलोअर्स, फेसबुकवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स, तर यूट्यूबवर जवळपास साडेपाच लाख सबस्क्राइबर्स आहेत. याशिवाय ते परिसरातील गोशाळेचे अध्यक्षही आहेत. मात्र, स्वतःच्या गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांना अपेक्षित जनसमर्थन मिळाले नाही. या गावात सुमारे १,६०० मतदार आहेत.
सोशल मीडियावर ट्रोलिंग
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सोशल मीडियावर बिश्नोई यांना ट्रोल करण्यात आले. इतरांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या पराभवाचा अंदाज आला नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र सोशल मीडियावरील लोकप्रियतेपेक्षा स्थानिक संपर्क, गावातील कामे आणि वैयक्तिक संबंध अधिक महत्त्वाचे ठरतात, असे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले.
पराभवानंतरही मतदारांचे आभार
निकालानंतर बिश्नोई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून गावातील मतदारांचे आभार मानले. सुमारे १,६०० मतदारांपैकी केवळ ३३ जणांनी आपल्याला मतदान केल्याचे सांगत त्यांनी या पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच, आपण मतदारांना कसल्याही नशिले पदार्थ किंवा मद्य न वाटता निवडणूक लढवल्याचे नमूद केले.
भगवान द्वारकाधीश सर्वांना आशीर्वाद देवोत
“कठीण काळात आपल्यासोबत खरोखर कोण उभे आहे, हे समजते,” असे म्हणत त्यांनी भगवान द्वारकाधीश सर्वांना आशीर्वाद देवोत, अशी प्रार्थनाही केली. लाखो ऑनलाईन चाहते आणि प्रत्यक्ष मतदारांचा कौल यांत मोठे अंतर असू शकते, हे बिश्नोई यांच्या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.


