चेन्नई : आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘अर्नब’ चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमान वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. (Cyclone Arnab: 12 Chennai flights to Andhra Pradesh cancelled, passengers stranded ) मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, विजयवाडा व राजमहेंद्रवरम या शहरांदरम्यानची इंडिगोची एकूण १२ उड्डाणे बुधवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांना विमानतळावर गैरसोयीचा सामना करावा लागला.
रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये चेन्नईहून जाणाऱ्या सहा आणि चेन्नईत येणाऱ्या सहा विमानांचा समावेश आहे. चेन्नईहून विशाखापट्टणमसाठी पहाटे ५.२५, सकाळी १०.३० आणि दुपारी ४ वाजताची, विजयवाड्यासाठी सकाळी ७ आणि दुपारी २.४५ वाजताची, तर राजमहेंद्रवरमसाठी दुपारी २.३५ वाजताची उड्डाणे रद्द करण्यात आली. प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून उड्डाणांची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंध्र किनारपट्टीवर वादळाचा कहर
‘अर्नब’ चक्रीवादळाने बुधवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काकीनाडा आणि पुद्दुचेरीतील यादरम्यान धडक दिली. वादळाचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटर आहे. वाऱ्याचा झोत ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्याचे वृत्त आहे. काकीनाडा परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली, तर वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. विशाखापट्टणममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे बीच रोड आणि सीतम्मधारा परिसरातील रस्त्यांवर झाडे कोसळली.
अनकापल्ली आणि विशाखापट्टणम जिल्ह्यांतील काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत घरातच राहावे आणि विजेचे खांब, जाहिरात फलक तसेच जुन्या झाडांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन पथके रस्ते मोकळे करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागांत मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
ओडिशात अतिवृष्टीचा इशारा; झारखंडमध्ये शाळा बंद
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (IMD issues warning for Odisha ) गजपती, गंजाम, रायगड, कोरापुट, नबरंगपूर आणि मलकानगिरी येथे काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. इतर अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने रांची, पश्चिम सिंहभूम, पूर्व सिंहभूम आणि सिमडेगा या जिल्ह्यांतील शाळा २९ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Schools closed in parts of Jharkhand till Oct 29)
दैनंदिन जनजीवन विस्कळीत
चक्रीवादळामुळे विमान वाहतूक, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे. पुढील हवामान परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


