पणजी : पहाटे नरकासुर प्रतिमांच्या दहनानंतर रविवारी गोव्यात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे अभ्यंगस्नान, देवदर्शन आणि पारंपरिक पोह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर सायंकाळी घराघरांत लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली. पणती, आकाशकंदील आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजलेली घरे, फुलांच्या तोरणांनी नटलेले दरवाजे आणि सर्वत्र दरवळणारा उदबत्ती, धुपाचा सुगंध अशा मंगलमय वातावरणात गोमंतकीयांनी धन, संपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेले दैवत श्री लक्ष्मी मातेचे भक्तिभावाने पूजन केले.
दिवाळीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. फुले, फळे, मिठाई, पणत्या, पूजेचे साहित्य तसेच आकर्षक आकाशकंदिलांना मोठी मागणी आहे. व्यापारी आणि व्यावसायिकांनीही आपल्या दुकाने व आस्थापनांची स्वच्छता करून लक्ष्मीपूजन केले.
सायंकाळी शुभमुहूर्तावर घरांमध्ये श्री लक्ष्मी- श्री गणेश आणि कुबेराचे पूजन करण्यात आले. धनधान्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी देवी लक्ष्मीसमोर प्रार्थना करण्यात आली. घरांच्या अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्या काढून त्यामध्ये पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. घरांच्या खिडक्या, बाल्कनी आणि सज्जांवर लावलेल्या दिव्यांच्या रोषणाईने गोव्यातील शहरे, ग्रामीण भाग आणि कानाकोपरा उजळून निघाला. श्री लक्ष्मीपूजनाच्या धार्मिक वातावरणाने उत्सव भक्तिमय बनला.
गोमंतकीय कुटुंबांमध्ये दिवाळीच्या सकाळी पोह्यांचे विविध प्रकार बनवून त्याचा नैवेद्य दाखवण्याचीही परंपरा आहे. त्याचबरोबर शेजाऱ्यांच्या घरात विविध प्रकारच्या पोह्यांच्या पदार्थांनी भरलेले ताट ही अदान-प्रदान केले जाते. त्यातून दिवाळीचा आनंद, एकोपा अधिक द्विगुणीत होत असतो. धार्मिक विधींसोबतच खाद्यसंस्कृती आणि कौटुंबिक स्नेहबंध जपणारा हा सण गोव्यात उत्साहात साजरा केला जात आहे.
व्यापारी वर्गासाठी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने दुकानांमध्ये हिशेबाच्या वह्या, रोकड पेट्या आणि व्यापाराशी संबंधित साहित्याची पूजा करण्यात आली. नवीन आर्थिक वर्षासाठी भरभराट, व्यवसायात यश आणि आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी व्यापाऱ्यांनी श्री लक्ष्मी देवीचे पूजन करून प्रार्थना केली.
दिव्यांच्या प्रकाशात उजळलेल्या गोव्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत दिवाळीचा उत्साह कायम होता. ‘अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय’ हा संदेश देत दीपोत्सवाने गोमंतकीयांच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धीची नवी आशा निर्माण केली आहे. आजपासून सुरू झालेला उत्सव, उत्साह पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. यापुढे गुरांचा पाडवा (गोरवांचा पाडवा), भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याची ओळख असलेली भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने पुढील काही दिवस दीपोत्सवाच्या मंगलमय प्रकाशात गोवा उजळून निघणार आहे. देव दिवाळी (व्हडली दिवाळी), तुळशी विवाहाने दिवाळीची सांगता होणार आहे. दीपोत्सवाच्या प्रकाशात सर्वांच्या जीवनात मंगलमय प्रकाशाची उधळण होत या प्रकाशात जीवन उजळून निघू दे, हीच शुभेच्छा! तम् सो मा ज्योतीर्गमय..!


