चौपदरी महामार्गासाठी अतिरिक्त जमीन संपादीत

रस्त्यावर उतरण्याचा भोमा ग्रामस्थांतर्फे संजय नाईक यांचा इशारा; जुने गोवे ते भोमापर्यंतच्या पट्ट्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्राने अतिरिक्त ८८६३ चौ.मी. जमिनीचे संपादन केले आहे. या विषयीची अधिसूचना जारी झाली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर भोमा ग्रामस्थांतर्फे संजय नाईक यांनी तीव्र विरोध दर्शविला असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
चौपदरी महामार्गासाठी अतिरिक्त जमीन संपादीत

पणजी : जुने गोवे ते भोमापर्यंतच्या (Old Goa To Bhoma road) पट्ट्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्राने अतिरिक्त ८८६३ चौ.मी. जमिनीचे संपादन केले आहे. या विषयीची अधिसूचना जारी झाली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर भोमा ग्रामस्थांतर्फे संजय नाईक यांनी तीव्र विरोध दर्शविला असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोमा रस्त्याचे चौपदरीकरण पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत.

राज्यात नवीन रस्ते तसेच चौपदरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. निवडणूक जवळ पोचल्याने या कामांना आता आणखी वेग आला आहे. पणजी - फोंडा अनमोडपर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. जुने गोवे ते भोमापर्यंतच्या पट्ट्याचे चौपदरीकरण बाकी आहे. या कामासाठी आता ८८६३ चौमी अतिरिक्त जमिनीचे संपादन करण्यात आले आहे.

कुंडई व भोमा पंचायत क्षेत्रातील लहान मोठ्या ४२ खासगी भागांचा यात समावेश आहे. यापूर्वी जमीन संपादनाची प्रस्तावित अधिसूचना जूनमध्ये जारी झाली होती. हरकती व सूचनांचा विचार झाल्यानंतर आता अंतिम अधिसूचना जारी झाली आहे. जुने गोवे ते भोमापर्यंत ७ किमीच्या चौपदरीकरणासाठी हे जमीन संपादन आहे.

भोमा येथील सातेरी देवस्थानला धोका : संजय नाईक

जमीन संपादनाची अधिसूचना जारी झाल्यानंतर भोमाचे ग्रामस्थ संजय नाईक यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे भोमा येथील सातेरी देवस्थानला धोका असल्याचे ते म्हणाले. सातेरी देवस्थान सुरक्षीत ठेवून चौपदरीकरणाचे काम केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारने बऱ्याच वेळा दिले आहे. मात्र भोमावासीयांचे अजिबात समाधान झालेले नाही.

केवळ चारच घरे जाणार असल्याचे सरकार सांगत असले तरी पुनर्वसन आराखडा कुठे आहे? स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी पुनर्वसन आराखडा सादर करण्यासह ग्रामस्थांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचे आव्हान संजय नाईक यांनी दिले आहे. अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांच्या वतीने संजय नाईक यांनी दिले आहे.