दक्षिण गोव्यातून ५,५४० नावे वगळली

मतदारयादी प्रसिद्ध : ११ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती नोंदविण्याचे आवाहन

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
12th November, 11:31 pm
दक्षिण गोव्यातून ५,५४० नावे वगळली

मडगाव : विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसएसआर) दक्षिण गोवा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची एकत्रित प्रारूप मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख ३० हजार १८५ मतदार असून, पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान ५,५४० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लीटस (आयएएस) यांनी ही माहिती दिली. मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत प्रारूप मतदारयादीच्या प्रती सुपूर्द करण्यात आल्या.

प्रारूप मतदार यादीनुसार दक्षिण गोवा जिल्ह्यात २ लाख ७ हजार १ पुरुष, २ लाख २३ हजार १७६ महिला आणि ८ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ४ लाख ३० हजार १८५ मतदार आहेत.

मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, अनिवासी भारतीय मतदारांसाठी नमुना ६ अ, नाव समाविष्ट करण्यास किंवा वगळण्यास हरकत घेण्यासाठी नमुना ७, तर पत्ता बदलणे, मतदार नोंदींमध्ये दुरुस्ती, मतदार ओळखपत्र बदलणे तसेच दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी नमुना ८ भरता येणार आहे.

नागरिकांना आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर किंवा ‘ईसीआयनेट’ ॲपद्वारे सादर करता येतील. दावे व हरकतींच्या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी दर आठवड्याला प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची छापील यादी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून देणार आहेत.

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत असमाधान असल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २४ (अ) अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, दक्षिण गोवा यांच्याकडे प्रथम अपील करता येणार आहे. त्यानंतर या निर्णयाविरुद्ध कलम २४ (ब) अंतर्गत गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे.

आगामी निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता आणि अन्य तपशील तपासून घ्यावेत. यादीत काही त्रुटी किंवा हरकती असल्यास ११ डिसेंबरपूर्वी आवश्यक अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी क्लीटस यांनी केले आहे.