पेडणे : मांद्रे मतदारसंघातील चोपडे येथील फुटबॉल मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मैदानाच्या उद्घाटनाला ११ वर्षे उलटूनही आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक फुटबॉल खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
२०१६ मध्ये या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आजही मैदानाची योग्य देखभाल आणि दुरुस्ती झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे. मैदानाच्या सभोवतालचे लोखंडी सुरक्षा कठडे तुटले असून त्यांना गंज चढला आहे. फुटबॉल खेळताना चेंडू मैदानाबाहेर रस्त्यावर किंवा पाण्यात जात असल्याने सुरक्षा कठड्यांची उंची वाढविण्याची गरज आहे.
मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून ते कापण्यात आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंना व्यवस्थित खेळता येत नाही. मैदानाच्या बाजूला पुरेशी विद्युत रोषणाई नसल्याने संध्याकाळच्या वेळी खेळण्यास अडचणी येतात. व्यासपीठाला छप्पर किंवा पत्रे नसल्याने पावसाळ्यात त्याचा वापर करणेही कठीण होणार आहे.
प्रेक्षकांसाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या आसन व्यवस्थेचीही दुरवस्था झाली असून सिमेंट निघून गेले आहे. मैदानाला प्रवेशद्वाराला योग्य कुलूपबंद व्यवस्था नसल्याने मोकाट गुरे आणि कुत्रे मैदानात प्रवेश करतात. त्यामुळे मैदान अस्वच्छ होत आहे. मैदानाच्या बाजूला काटेरी झुडपे वाढली असून कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. खेळाडूंसाठी शौचालयाची सुविधाही उपलब्ध नाही.
खेळामुळे मुलांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. मात्र खेळण्यासाठीच योग्य मैदान उपलब्ध नसेल, तर ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंनी आपली गुणवत्ता विकसित कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
११ वर्षांनंतरही चोपडेचे फुटबॉल मैदान विकसित का झाले नाही? स्थानिक खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळणार तरी कधी? असा सवाल विनोद पाटील आणि भगवान साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
फुटबॉल मैदानाच्या दुरवस्थेबाबत नाराजी
शिवसेना मांद्रे प्रमुख विनोद पाटील आणि भगवान साळगावकर यांनी फुटबॉल मैदानाच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा आणि गोवा सरकारच्या क्रीडा खात्याने या मैदानाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. फुटबॉल मैदानाची तातडीने पाहणी करून मैदानावरील गवत काढणे, सुरक्षा कठड्यांची उंची वाढविणे, तुटलेल्या ग्रिलची दुरुस्ती, विद्युत दिवे, व्यासपीठावर छप्पर, प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छता आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


