म्हापसा : गोगेरेमवाडा, आसगाव येथे धावजेकर यांच्या बंगल्यातील बांबू सजावटीच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सापडल्याने चारजण गंभीर जखमी झाले. त्यात दुकानाचे पर्यवेक्षक संजय मडगावकर, सूरज चव्हाण, रत्नेश चव्हाण संदेश सावंत यांचा समावेश आहे. त्यातील दोघांची प्रकृत्ती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ गोवा वैद्यकीय महाविद्यलयात (गोमेकॉ) पाठवण्यात आले आहे.
ही दुर्घटना आज दुपारी३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आग ‘शार्टसर्कीट’मुळे लागल्याचा अंदाज असून, आगीत दुकानातील सामान तसेच चार वाहने भस्मसात झाली आहेत. या घटनेच्या वेळी दुकानात संजय मडगावकर व दोघे काम करीत होते. ते या आगीत सापडले. दुकानाला आग लागल्याचा प्रकार निदर्शनास येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व दुकानात सापडलेल्यांना बाहेर काढले. रूग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे जखमींना दुचाकीवरून उपचारार्थ म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. दोघांना रूग्णवाहिकेतून इस्पितळात आणले गेले.
अग्निशमन दलाची गाडी अर्धातास उशीरा
घटनास्थळी म्हापसा अग्निशमन दलाच्या गाडीला पोहोचायला अर्धातास लागला. तोपर्यंत स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेचा पंचनामा हणजूण पोलिसांनी केला. पुढील तपास सुरू आहे.


