पैंगीण : पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे (Deputy Superintendent of Police Nilesh Rane) यांनी घरात एकटे राहणाऱ्या काणकोण येथील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांसंदर्भात (Cyber crime) जागृती करून सावध राहण्याचे आवाहन केले. वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना खालील गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला बँक खाते क्रमांक (Bank Account Number) देऊ नका. अनोळखी क्रमांकावरून येणारे फोन कॉल्स स्वीकारताना विशेष सावधगिरी बाळगावी. आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी (One Time Password) कधीही आणि कोणासोबतही शेअर करू नका.काणकोण पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागृती केली.
यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक तेरॉन डिकॉस्ता, उपनिरीक्षक विशाल वेळीप उपस्थित होते. काणकोण तालुक्यातील पोळे ते खोला आणि गुळे ते श्रीस्थळ या भागातील महामार्ग तसेच ग्रामीण भागांत पोलीस वाहनांद्वारे नियमित गस्त घातली जात आहे.
गेल्या वर्षभरात अमली पदार्थांशी संबंधित १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की संशयास्पद व्यक्ती आढळल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.
यावेळी पोलीस निरीक्षक तेरॉन डिकॉस्ता आणि उपनिरीक्षक विशाल वेळीप यांनी सायबर गुन्हे, डिजिटल सेवा, बँकिंग व्यवहार, एपीके फाइल्स, समाजमाध्यमे याविषयी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. बैठकीला होनेरात फर्नांडिस, कमलाकर ना. गावकर, दयानंद फळदेसाई, नातिविदाद डिसा, शिवानंद वैद्य, सुरेश राणे, विलास प्रभू यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


