पणजीः राज्यातील सरकारी खाती, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांमधील स्टेनोग्राफरची पदे टप्प्याटप्प्याने रद्द करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. (Government (Goa) departments stenographer posts to be cancelled) मात्र, न्यायालयांतील पदांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.
कनिष्ठ लघुलेखक (ज्युनियर स्टेनोग्राफर) आणि लघुलेखक श्रेणी-२ ही पदे रद्द करण्यात येतील. या पदांवर नव्याने भरती करण्यास बंदी घालण्यात आली असून, न्यायालये मात्र या निर्णयातून वगळण्यात आली आहेत.
गोवा सरकारच्या कार्मिक खात्याने नोव्हेंबर रोजी यासंदर्भात कार्यालयीन विज्ञापन जारी केले आहे. सध्याच्या संगणक युगात टंकलेखन संगणकावर होत असून, लघुलेखन कौशल्याचा अधिकाऱ्यांकडून फारसा वापर होत नसल्याचे निरीक्षण सरकारने नोंदवले आहे.
निर्णयानुसार, संबंधित पद निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती, निधन किंवा अन्य कारणाने रिक्त झाल्यास ते आपोआप रद्द होईल. पद रिक्त झाल्यापासून ६० दिवसांच्या आत संबंधित खात्याला रद्दबातल आदेश काढावा लागेल.
सध्या या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत किंवा पदोन्नती मिळेपर्यंत सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे. वरिष्ठ लघुलेखक आणि लघुलेखक श्रेणी-१ ही पदे कायम राहतील. तसेच, बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांची सेवा खात्याच्या गरजेनुसार सुरू ठेवता येईल.


