गोवा : मातीच्या मूर्ती साकारणाऱ्या कलाकारांना ३.०३ कोटींचे अनुदान

गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाने (जीएचआरएसएसआयडीसी) गेल्या चार वर्षांत कलाकारांना ३ कोटी ३ लाख १८ हजार ८०० रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. या माध्यमातून २ लाख ५ हजार ३८० मातीच्या मूर्तींना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. यासाठी एकूण १,५३९ कलाकारांनी अर्ज केले होते. यंदा २०२६ मध्ये अनुदानासाठी सुमारे ५०० कलाकारांनी महामंडळाकडे अर्ज सादर केले आहेत.

Story: गोवन वार्ता उमेश झर्मेकर |
just now
गोवा : मातीच्या मूर्ती साकारणाऱ्या कलाकारांना ३.०३ कोटींचे अनुदान


म्हापसा : गणेश चतुर्थीनिमित्त पारंपरिक मातीच्या मूर्ती साकारणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाने (जीएचआरएसएसआयडीसी) गेल्या चार वर्षांत कलाकारांना ३ कोटी ३ लाख १८ हजार ८०० रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. या माध्यमातून २ लाख ५ हजार ३८० मातीच्या मूर्तींना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. यासाठी एकूण १,५३९ कलाकारांनी अर्ज केले होते. यंदा २०२६ मध्ये अनुदानासाठी सुमारे ५०० कलाकारांनी महामंडळाकडे अर्ज सादर केले आहेत.
राज्यातील पारंपरिक मातीच्या मूर्तीकारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने महामंडळामार्फत ‘क्ले आयडॉल्स सबसिडी स्कीम’ लागू केली आहे. या योजनेंतर्गत महामंडळाकडे नोंदणी केलेल्या कलाकारांना जास्तीत जास्त १५० मातीच्या मूर्तींसाठी अनुदान दिले जाते. सुरुवातीला प्रति मूर्ती १०० ते ३०० रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. मात्र प्रति मूर्ती २०० रुपयांपर्यंत अनुदान देण्यास मंजुरी मिळाली आहे. अधिकृत तपासणी अहवाल आणि अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र कलाकारांना अनुदान वितरित केले जाते.
२०२२ ते २०२५ या चार वर्षांत एकूण ३ कोटी ३ लाख १८ हजार ८०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये राज्यातील सर्व १२ तालुक्यांतून ४१० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४०६ कलाकारांचे अर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये डिचोली तालुक्यातील सर्वाधिक ११४, पेडणे तालुक्यातील ८२ आणि सत्तरी तालुक्यातील ४५ कलाकारांचा समावेश होता. या ४०६ कलाकारांना एकूण १ कोटी ५ लाख १२ हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात आले. यंदाच्या वर्षातील पात्र लाभार्थ्यांना लवकरच अनुदान वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

मूर्ती विक्रीसाठीही महामंडळाचे व्यासपीठ
- मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या कलाकारांना केवळ अनुदानच नव्हे, तर त्यांच्या मूर्तींच्या विक्रीसाठीही महामंडळाने पुढाकार घेतला आहे. पणजीतील मळा येथील क्राफ्ट कॉम्प्लेक्समध्ये कलाकारांना मूर्ती विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. २०२४ मध्ये महामंडळाने ३१० मातीच्या गणेशमूर्तींची विक्री केली होती, तर २०२५ मध्ये ४०० हून अधिक मातीच्या गणेशमूर्ती सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या.
- याशिवाय, गेल्या वर्षी नागपंचमीनिमित्त मातीचे नागोबा आणि जन्माष्टमीनिमित्त बाळकृष्णाच्या मूर्तींचीही विक्री करण्यात आली. संजय स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मातीच्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठीही महामंडळाने पुढाकार घेतला होता. या उपक्रमांमुळे पारंपरिक मूर्तिकारांसह विद्यार्थ्यांनाही आपल्या कलाकृती सादर करण्याची आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.


हेही वाचा
सर्व पहा