रुग्णवाहिका घेऊन ते धावून गेले, पण समोर होते त्यांच्या मुलाचेच कलेवर..!

काणकोणातील दुर्दैवी घटना : रुग्णवाहिका चालकावर कोसळला दुःखाचा डोंगर

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
रुग्णवाहिका घेऊन ते धावून गेले, पण समोर होते त्यांच्या मुलाचेच कलेवर..!

काणकोण : दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रंदिवस रुग्णवाहिका घेऊन धावणाऱ्या एका पित्याला नियतीने अत्यंत वेदनादायी धक्का दिला. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तो युवक आपलाच मुलगा असल्याचे समजताच या पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काणकोण सरकारी इस्पितळातील रुग्णवाहिका चालक सदानंद फडते यांच्यावर मुलाच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण काणकोण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सदानंद फडते हे काणकोण सरकारी इस्पितळात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत आहेत. गंभीर रुग्णांना काणकोणहून मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पोहोचवण्याची जबाबदारी ते नियमितपणे पार पाडतात. दरम्यान, सायंकाळी भाटपाल येथे फुटबॉलचा सामना पाहत असताना विघ्नेश फडते (२०) हा युवक अचानक कोसळला. उपस्थितांनी त्याला तातडीने काणकोण सरकारी इस्पितळात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
स्वतःच्याच मुलाला गमावले
युवकाला पुढील सोपस्कारांसाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळात नेण्याची तयारी सुरू होती. याच वेळी भाटपाल येथून आणलेला युवक आपलाच मुलगा विघ्नेश असल्याचे सदानंद फडते यांना समजले. क्षणात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णवाहिका चालक म्हणून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी धावणाऱ्या या पित्याला स्वतःच्या मुलाचा जीव वाचवता आला नाही, ही बाब मन हेलावून टाकणारी ठरली. या दुर्दैवी घटनेने फडते कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा
सर्व पहा