नवी दिल्ली : देशभरात दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी उत्तर भारतात प्रदूषणाची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘एक्यूआय डॉट इन’ द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक वायु गुणवत्ता रँकिंगनुसार, जगातील १०० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी तब्बल ९३ भारतीय शहरे या यादीत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, या यादीत राजस्थानमधील श्रीगंगानगर शहर ८६८ इतक्या सर्वाधिक घातक (हॅझार्डस) एक्यूआयसह जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.
दिवाळीनंतर ८ नोव्हेंबरच्या रात्री आणि ९ नोव्हेंबर रोजी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, उत्तर भारतातील अनेक शहरांमधील हवा विषारी बनली आहे. पंजाबमधील फरिदकोटचा एक्यूआय ८४२, तर भटिंडाचा एक्यूआय ७९७ नोंदवला गेला. याशिवाय हरियाणातील सिरसा (६१२), भिवानी (५४८), उत्तर प्रदेशमधील बदायू (४८९), हिसार (४८५), अमृतसर (४५१) आणि प्रयागराज (४४०) यांसारख्या शहरांचा जगातील सर्वाधिक प्रदूषित टॉप-१० शहरांमध्ये समावेश झाला आहे. यामध्ये पाकिस्तानचे लाहोर शहर (एक्यूआय ४४६) नवव्या क्रमांकावर आहे.
राजधानी नवी दिल्लीतही हवेची गुणवत्ता अतिशय खालावली असून, दिल्लीचा एक्यूआय ३८० नोंदवला गेला आणि ती जागतिक स्तरावर १५ व्या क्रमांकावर होती. लखनौ (३४४), कानपूर (३३७), गाझियाबाद (३३१), आणि नोएडा (३०७) या शहरांमधील हवा देखील ‘अतिधोकादायक’ श्रेणीत कायम आहे. या प्रदूषणाचा फटका केवळ उत्तर भारतालाच नव्हे, तर पुणे (२७८), भोपाळ (२८४), पटना (२५८), वाराणसी (२४३), राजकोट (२४२) आणि नाशिक (२१९) यांसारख्या मध्य, पश्चिम व दक्षिणकडील शहरांनाही बसला आहे.
मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी!
दिवाळीच्या काळात मुंबई शहरात ठिकठिकाणी आगीच्या अनेक दुर्घटनेची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलत शहरात आकाशात उडणारे फटाके आणि ‘रॉकेट्स’च्या वापरावर तातडीने पूर्ण बंदी घातली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ता तथा ‘शहरातील नागरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या प्रभारी अध्यक्षा प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी ९ नोव्हेंबर रोजी याबाबतचा अधिकृत मनाई आदेश जारी केला असून, हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. हा बंदी आदेश ९ नोव्हेंबरच्या त्वरित अंमलबजावणीपासून ते २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू राहील. हा प्रतिबंधक आदेश सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही जागांवर लागू असणार आहे. यात निवासी इमारती, गच्ची (टेरेस), बाल्कनी, आवार, पार्किंग लॉट्स, झोपडपट्टी परिसर आणि पालिकेच्या हद्दीतील इतर सर्व ठिकाणांचा समावेश आहे.


