हॅमिल्टनमध्ये फलंदाजांची पुन्हा कसोटी लागण्याची शक्यता

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
just now
हॅमिल्टनमध्ये फलंदाजांची पुन्हा कसोटी लागण्याची शक्यता

हॅमिल्टन : फलंदाजीसाठी अत्यंत खडतर असलेल्या या मालिकेत आता हॅमिल्टनमधील खराब हवामानाचे सावट देखील दाटून आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण एकदिवसीय सामन्यात मंगळवारी (दि. १०) हॅमिल्टनमधील सेडन पार्कवर रंगणाऱ्या या लढतीत पुन्हा एकदा गोलंदाजांचेच वर्चस्व राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मागील दोन एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकल्यास, आधुनिक काळातील वेगवान आणि आक्रमक फलंदाजीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला. पाऊस आणि खेळपट्टीवरील ओलावा यामुळे गोलंदाजांना मिळालेला स्विंग आणि बाऊन्स फलंदाजांच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाजाविना मैदानात उतरलेल्या युवा भारतीय गोलंदाजी आक्रमणाने न्यूझीलंडच्या आघाडीच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. विशेषतः गुरनूर ब्रारचा वाढता वेग आणि उसळी किवी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे, भारतीय फलंदाजांनाही संकटांचा सामना करावा लागला असून, केवळ विराट कोहली (ऑकलंडमध्ये), ड्युरिल मिचेल आणि के.एल. राहुल यांचा अपवाद वगळता इतरांना मोठी धावसंख्या उभारताना घाम फुटला आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पडलेल्या मुसळधार पावसामुळे भारतीय संघाला आपला सराव इनडोअर करावा लागला. मंगळवारी होणाऱ्या सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, सामना धुऊन जाण्याची अथवा सामना अनिर्णित किंवा कमी षटकांचा होण्याची दाट शक्यता आहे. हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर न्यूझीलंडचा रेकॉर्ड अतिशय जबरदस्त असून, त्यांनी येथील शेवटच्या सलग १२ एकदिवसीय सामने जिंकले आहेत.
संभाव्य संघ
न्यूझीलंड :
विल यंग, टीम सेईफर्ट, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, मॅट फिशर.
भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), नमन धीर, अंशुल कंबोज, औकिब नबी, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध दोन हजार धावांच्या उंबरठ्यावर
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये एक मोठा विक्रम रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. किवी संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीला अवघ्या २२ धावांची गरज आहे. आजच्या सामन्यात तो हा टप्पा पार करेल, अशी अपेक्षा त्याचे चाहते बाळगून आहेत. सध्या भारत या मालिकेत २-० ने आघाडीवर असून, ऑकलंड आणि वेलिंगटनमधील विजयांमध्ये कोहलीने मोलाचे योगदान दिले आहे. आता हॅमिल्टन येथील तिसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून आणखी एक विक्रम पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
‘हिटमॅन’ षटकांच्या विक्रमापासून फक्त एक षटकार दूर!
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका ऐतिहासिक विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपल्या कारकिर्दीत तब्बल १,००० षटकार पूर्ण करण्यासाठी रोहितला आता फक्त एका षटकाराची गरज आहे. रोहितने आतापर्यंत आपल्या फलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये ८८, एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८३, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०५ आणि आयपीएलमध्ये ३२३ षटकार ठोकले आहेत. हा टप्पा गाठताच ख्रिस गेल आणि कीरोन पोलार्ड यांच्यानंतर १,००० षटकार पूर्ण करणारा तो जगातील तिसरा आणि भारताचा पहिलाच फलंदाज ठरेल.
रोहित शर्मा विक्रमापासून १३ धावा दूर
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना) या देशांमध्ये रोहितच्या नावावर सध्या ४,९८७ धावा (१७ शतके आणि २३ अर्धशतकांसह) जमा आहेत. अवघ्या १३ धावा काढताच तो या चारही परदेशी देशांमध्ये ५,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय सलामीवीर बनण्याचा मान मिळवणार आहे.