अमायरा धुमटकरची ऐतिहासिक कामगिरी

ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
01st November, 11:11 pm
अमायरा धुमटकरची ऐतिहासिक कामगिरी

पणजी : गोव्याची १० वर्षीय बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत राज्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. मुंबई (महाराष्ट्र) येथे २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या मानाच्या योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सब ज्युनियर (यू-१३) बॅडमिंटन रँकिंग स्पर्धेत अमायराने १३ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
तेलंगणाच्या सायना शर्मा हिच्या साथीने खेळताना अमायराने अंतिम फेरीत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम सामन्यात या जोडीने आंध्र प्रदेशच्या तिसऱ्या मानांकित एव्हलिन प्रियंक चवाली आणि श्री प्रव्या पोन्नागंटी या जोडीचा १५-१२, ९-१५, १७-१५ अशा ३ डावांच्या झुंजीनंतर पराभव केला.
गेल्या वर्षी ११ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या १० वर्षीय अमायरासाठी हे यश अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. १३ वर्षांखालील राष्ट्रीय रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अमायरा ही गोव्याची पहिलीच खेळाडू ठरली आहे.
गोवा बॅडमिंटन असोसिएशनकडून अभिनंदन व कॉर्पोरेट्सना सहकार्याचे आवाहन
अमायराच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे अभिनंदन करताना गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले, अमायरा ही अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे आणि वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी तिने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडू आणि त्यांच्या पालकांना विशेषतः प्रवास आणि प्रशिक्षणासाठी प्रचंड समर्पण, त्याग व आर्थिक गुंतवणूक करावी लागते. गोव्यातील अशा उगवत्या बालप्रतिभांना पाठबळ देण्यासाठी उद्योग संस्था आणि कॉर्पोरेट गृहांनी पुढे यावे, जेणेकरून हे खेळाडू आपले स्वप्न पूर्ण करून गोवा व देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील.