गुळेली पंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थित सरपंच नितेश गावडे व इतर.
वाळपई : मराठी भाषेला गोव्याची अधिकृत राजभाषा म्हणून दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव सत्तरी तालुक्यातील गुळेली ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. प्रेमानंद नाईक यांनी हा ठराव मांडला. सरपंच आणि पंचसदस्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला.
रविवारी सरपंच नितेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी बोलताना प्रेमानंद नाईक यांनी सत्तरीतील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. मंदिरांमधील भजने, कीर्तने, धार्मिक प्रवचने आणि विविध पारंपरिक विधींमध्ये मराठी भाषेचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेचे महत्त्व कमी होणे हा गोव्याच्या सांस्कृतिक वारशावर आघात ठरेल. मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांचे गोव्याच्या संस्कृतीशी जवळचे नाते असून, स्थानिक भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सरकारने मागणीची दखल घ्यावी
सरपंच नितेश गावडे यांनीही मराठी भाषेने सत्तरीची सांस्कृतिक ओळख जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत ठरावाला पाठिंबा दिला. सरकारने ग्रामसभेच्या ठरावाची दखल घेऊन मराठीला अधिकृत राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


