४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; म्हापशातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

म्हापसा : येथील शहर व मार्केटमधील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी म्हापसा नगरपालिकेने उभारलेले सीसीटीव्ही कॅमेरे २०२१ पासून बंद आहेत. खासदार निधीतून १ कोटी रूपये खर्चून ८३ ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा निर्णयही गेले दीड वर्षे फाईलमध्ये धुळखात पडला आहे. परवा म्हापशात घडलेल्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारानंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
25 mins ago
४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; म्हापशातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

म्हापसा : येथील शहर व मार्केटमधील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी म्हापसा नगरपालिकेने उभारलेले सीसीटीव्ही कॅमेरे २०२१ पासून बंद आहेत. खासदार निधीतून १ कोटी रूपये खर्चून ८३ ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा निर्णयही गेले दीड वर्षे फाईलमध्ये धुळखात पडला आहे. परवा म्हापशात  घडलेल्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारानंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांना दोन दिवसांनंतरही संशयिताचा शोध लावणे शक्य झालेले नाही.

म्हापसा नगरपालिकेने (Mapusa Muncipality)  पालिका बाजारपेठेत २०१५ मध्ये सात सीसीटिव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारले होते. त्यानंतर २०१८ मध्ये शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी अजून आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या सर्व कॅमेरांद्वारे शहर व मार्केट मधील हालचालींची टेळणी वाहतूक पोलीस व म्हापसा पोलीस (Mapusa Police) करत होते.

कालांतराने डागडुजीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे २०१९ पासून तर शहरातील कॅमेरे २०२१ मध्ये बंद पडले. त्यानंतर गेली पाच वर्षे हे कॅमेरे बंद आहेत.  पोलिसांच्या वारंवार पाठवलेल्या स्मरणपत्रांकडेही पालिका मंडळ तसेच पालिका अधिकारी आणि पालिका अभियंत्यांनी  दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नादुरूस्त अवस्थेत असलेले हे कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प दीड वर्षे पडून

 म्हापसा शहरात खासदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारण्याच्या केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रस्तावाला पालिका मंडळाने फेब्रुवारी २०२५ मध्ये मान्यता दिली होती. एप्रिल २०२५ मध्ये १ कोटी रूपये खर्चून दोन टप्प्यांमध्ये मार्गी लावण्यात येणार्‍या या प्रकल्पाची संबंधित व  अधिकार्‍यांना दीड वर्षे उलटूनही कार्यवाही करण्यात अपयश आले आहे. शहरात एखादी गुन्हेगारी दुर्घटना घडल्यानंतर पालिका तसेच प्रशासन जागे होते. म्हापशात हा प्रकार गेली पाच वर्षे सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.    

दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये गणेशपुरी येथील डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेसह गेले वर्षभर गणेशपुरी हाऊसिंग बोर्ड आणि पेडेसह म्हापसा शहर आणि बाजारपेठेत जबरी चोरीच्या कित्येक घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरांचा प्रश्न उपस्थित झाला होता.

तपासासाठी खासगी सीसीटीव्ही फुटेजचा आधार

जून २०२१ मध्ये गोमेकॉमधून एका नवजात बालकाला पळवण्याचा प्रकार घडला होता. सदर बालक घेऊन संशयित महिला म्हापशात उतरली होती. मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजचा आधारे पोलिसांना घ्यावा लागला होता. 

२८ ठिकाणी कॅमेरे बसवण्याची योजना अडकली

२०२२ मध्ये पालिका मंडळाने शहरातील २८ मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची योजना आखली होती. २५ लाख रूपये खर्चाचा हा प्रकल्प १५ व्या वित्त आयोगाच्या निधीद्वारे राबवण्यास नगरविकास खात्याने मान्यता दिली होती. ही योजनाही चालीस लागलेली नाही.  

हेही वाचा
सर्व पहा