गुडगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलीस पथक धारवाडला होणार रवाना

म्हापसा येथील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
12th November, 11:38 pm
गुडगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलीस पथक धारवाडला होणार रवाना

म्हापसा : येथील बाजारपेठेत दिवाळीच्या दिवशी ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पुंडलिक करियाप्पा गुडगे (२८, धारवाड, कर्नाटक) याची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी म्हापसा पोलिसांचे पथक शुक्रवारी धारवाडला रवाना होणार आहे. आरोपीच्या मूळ गावातील नातेवाईक तसेच स्थानिक पोलिसांची भेट घेऊन त्याच्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून केला जाणार आहे.
बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजता पणजी येथील कदंब बसस्थानकावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या एका बेघर मित्राची मदत घेतली होती. अटकेनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, ही दुर्दैवी घटना रविवारी (८ नोव्हेंबर) रात्री ८ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली होती. संशयिताने म्हापसा बाजारपेठेतून चार वर्षीय बालिकेला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर एका जीर्ण इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. घटनेनंतर तीन दिवसांनी, बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), ६५(२), गोवा बाल हक्क कायद्यातील कलम ८ व ८(२), तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, १० व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास म्हापसा पोलीस करत आहेत. पीडित बालिकेवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत.
संशयित दहा वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास
संशयित पुंडलिक गुडगे गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होता. तो हमालीसह मिळेल ती छोटी-मोठी कामे करत असे. त्याचे वास्तव्य निश्चित ठिकाणी नसून तो टॅक्सी स्थानक, बाजारपेठ किंवा बसस्थानकांवर झोपत असे. त्याची यापूर्वी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का, तसेच तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली अन्य माहिती मिळवण्यासाठी पोलीस पथक शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) त्याच्या मूळ गावी जाणार आहे.          

हेही वाचा
सर्व पहा