पणजी : रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात मेरशी येथील ‘पॉक्सो’ न्यायालयाने निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि संशयित महिलेला अतिरिक्त सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. याबाबतचा आदेश न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला. दरम्यान, पीडित मुलीने न्यायालयात दोन्ही संशयितांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाला हस्तक्षेप केला आहे. त्यावर १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीची दखल घेऊन जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळपकर यांनी देयकर आणि संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) २०१२ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दोन्ही संशयितांची अनुक्रमे ३१ ऑक्टोबर, २ नोव्हेंबर आणि ४ नोव्हेंबर रोजी कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांच्या जबाबांमध्ये मोठी तफावत आणि विसंगती आढळून आली. तसेच, प्रकरणातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे देण्यात हे दोघेही अपयशी ठरल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्या दोघांना प्रथम एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. चार दिवसांनी ती पुन्हा वाढवली. दरम्यान, त्या दोघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. त्या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघा संशयितांना अतिरिक्त सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
दरम्यान पीडित मुलीने संशयिताच्या जामीन अर्जाला विरोध करत हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवार १६ रोजी सुनावणी होणार आहे.
मुलीवर गोमेकॉत उपचार सुरू
गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीला मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) इस्पितळात भरती करण्यात आले आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस खात्याने निरीक्षक विकास देयकर याला निलंबित केले आहे.


