पणजी : ‘एस्मा’ लागू केल्यानंतर कदंब महामंडळाचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे कदंब कर्मचाऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप मागे घेतला आहे. सेवेत कायम करण्यासह अन्य मागण्यांवर चर्चा करून त्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
कदंबचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर आणि कर्मचारी संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी ही माहिती दिली. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, वेतनवाढ, रात्रीच्या मुक्कामासाठी विश्रांती कक्ष आणि इतर सुविधा अशा एकूण २० मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास १२ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला होता.
या मागण्यांसंदर्भात कदंब कर्मचारी संघटनेच्या अनेक बैठका झाल्या. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार केला जाईल, त्यामुळे त्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी केले होते. दरम्यान, कर्मचारी संघटनेने संपाची नोटीस दिल्यानंतर सरकारने सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी ‘एस्मा’ लागू केला होता.
मंगळवारी सायंकाळी कदंब व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला. बैठकीला कदंबचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, सरव्यवस्थापक महेंद्र पेडणेकर, आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सेका, चंद्रकांत चोडणकर, अॅड. सुहास नाईक आणि सहाय्यक कामगार आयुक्त प्रसाद पेडणेकर उपस्थित होते.


