मडगाव : येथील नीलगिरी अपार्टमेंट इमारतीच्या वरचा मजल्याचा काही भाग बुधवारी पुन्हा अचानक कोसळल्याची घटना घडली. गेल्या महिन्यातही या इमारतीच्या काही भागाची पडझड झाली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांनी इमारतीतील सर्व रहिवाशांना तातडीने सदनिका रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या पडझडीनंतर इमारतीच्या बांधकामाच्या मजबुतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा वरच्या मजल्याचा काही भाग कोसळल्याने इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तसेच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण इमारत रिकामी करण्याचे निर्देश दिले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तिच्या सुरक्षिततेबाबत अंतिम निष्कर्ष येईपर्यंत रहिवाशांना तेथे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. या आधी इमारतीमधील काही कुटुंबांनी ही इमारत सोडून इतरत्र राहण्यास गेले आहेत. सध्या तीन कुटुंबातील सात ते आठ जण तळमजल्याच्या भागात राहत होते. त्यांना दुसरीकडे वास्तव्यासाठी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.
दरम्यान, इमारतीच्या सुरक्षिततेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर आणि सुरक्षाविषयक निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


