गुरुदास सावळ यांना पत्रकारितेतील जीवनगौरव पुरस्कार

गोवा राज्य पत्रकार पुरस्कार जाहीर : प्रुडंट मीडिया, भांगरभूंयची छाप

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
12th November, 11:28 pm
गुरुदास सावळ यांना पत्रकारितेतील जीवनगौरव पुरस्कार

पणजी : माहिती व प्रसिद्धी खात्याने पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गोवा राज्य पत्रकार पुरस्कारां’च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कला आणि संस्कृतीवरील वार्तांकनासाठीचा पुरस्कार भांगरभूंय दैनिकाचे समीप नार्वेकर यांना ‘चुडटाची शेंदरी इतिहास जमा जावपाचे वाटेर’ या वार्तांकनासाठी मिळाला आहे.

गोवा राज्य पत्रकार पुरस्कार हे मागील कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेख, वृत्त यांसाठी दहा श्रेणींमध्ये प्रदान केले जातात आणि यामध्ये प्रत्येक श्रेणीत २५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकाव्यतिरिक्त प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. यावर्षी विजय एस. डिसोझा यांनी सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार, तर प्रुडंट मीडियाचे शिरीष कुंकळेकर यांनी त्यांच्या ‘ जायो, ब्लूम इन बॅटल’ या व्हिडिओ स्टोरीसाठी ग्रामीण वार्तांकन श्रेणीतील पुरस्कार पटकावला आहे. प्रुडंट मीडियाचे लौकिक शिलकर यांना भांडुरा येथे म्हादई नदीच्या पाण्याचे अवैध वळण या व्हिडिओ रिपोर्टसाठी महिला आणि मुले/सामाजिक समस्या या विशेष संदर्भासह सर्वोत्कृष्ट वार्तांकनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रीडा रिपोर्टिंगमध्ये प्रुडंट मीडियाचे रोहित वाडकर यांना त्यांच्या ‘द लिजेंड- पद्मश्री ब्रह्मानंद शंखवाळकर’ या वार्तांकनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

निदा सय्यद यांना सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट वार्तांकनासाठी, गौरी मळकर्णेकर यांना शिक्षण वार्तांकनासाठी पुरस्कार मिळाला आहे. गायत्री कुंकळेकर यांना सरकारी कामगिरीवरील वृत्तांकनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. राजतिलक नाईक यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्र श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रवींद्र भवन, मडगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातील.