पणजी : रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि संशयित महिलेला मेरशी येथील ‘पॉक्सो’ न्यायालयाने एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्या. डॉ. पूजा कवळेकर यांनी हा आदेश दिला. दरम्यान, दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळपकर यांनी देयकर आणि संबंधित महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दोन्ही संशयितांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यांच्या जबाबांत तफावत आढळल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने टप्प्याटप्प्याने एक, चार आणि सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालयाने दोघांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या जामीन अर्जांवरील पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


