रायपूर : देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित 'महादेव ऑनलाइन बुक' (Mahadev Online Book) या बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सह-संस्थापक सौरभ चंद्राकर याच्याभोवतीचा कायद्याचा पाश अखेर आवळला गेला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सविस्तर कायदेशीर प्रक्रिया आणि तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ पाठलागानंतर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला अधिकृतपणे अटक केली. रायपूर येथील विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १९ नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण सिंडिकेटमधील हा पहिलाच मुख्य प्रवर्तक आहे, ज्याला कायदेशीर कारवाईसाठी भारतात परत आणण्यात यश आले आहे.
दरम्यान २०२४च्या मे महिन्यात छत्तीसगड पोलिसांनी सांकवाळ आणि इतर ठिकाणी छापा टाकून गोव्यातून महादेव सट्टा अॅप चालवणाऱ्या ७ आंतरराज्य बुकींना अटक करून रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी वरील सात जणांसह मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. त्याच्याकडून २५ लाख रुपयांची १३ लॅपटॉप, ४८ मोबाईल, १४ चेकबुक आणि ४० एटीएम कार्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटची चौकशी केली असता, त्यांनी १०० कोटीहून अधिक आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले होते. मनीष अमरलाल उदाषी ( ३६, रायपूर - छत्तीसगड), मधुर सेवल वलेचा (२२, रायपूर - छत्तीसगड), नारायण बहरिकराम निषाद (२३, रायपूर - छत्तीसगड), टिकेंद्र हीरामनलाल मांडवी (२५, दुर्ग - छत्तीसगड), दिनेश दिलीप वासवानी (३०, नागपूर - महाराष्ट्र), सौरभ नरेश मनुज (२२, वर्धा - महाराष्ट्र), कुलदीप शमशेर सिंग (२२, फतेहाबाद - हरियाणा) अशी सांकवाळ येथील दोन इमारतीमधून अटक करण्यात आलेल्या आंतरराज्य बुकींची नावे आहेत.
माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि त्याचा आणखी एक सह-संस्थापक रवी उप्पल हे दोघे जण दुबई येथील मुख्य कार्यालयातून भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पसरलेल्या 'बेटिंग पॅनेल्स'च्या फ्रँचायझीच्या माध्यमातून हे प्रचंड मोठे नेटवर्क चालवत होते. या बेकायदेशीर खेळांमधून गोळा होणारा ग्राहकांचा पैसा वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या बँक खात्यांमार्फत भारतातील बाहेर पाठवला जात असे आणि हा सर्व व्यवहार हवालाच्या माध्यमातून हाताळला जात होता. ईडीच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या मुख्य तक्रारीनुसार, या सिंडिकेटची मासिक कमाई तब्बल ४५० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
तपासादरम्यान असे दिसून आले की, सौरभ चंद्राकरने सप्टेंबर २०२३ मध्ये ईडीने जारी केलेल्या समन्सना कोणतेही उत्तर दिले नव्हते आणि तो सतत कायद्याची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या भूमिकेमुळे ईडीच्या अर्जावरून विशेष न्यायालयाने ०४ सप्टेंबर २०२३ रोजी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पावले उचलत ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलनेही (INTERPOL) त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती. छत्तीसगड उच्च न्यायालयाने २२ मार्च २०२५ रोजी त्याचे वॉरंट रद्द करण्याचे आव्हान फेटाळून लावले होते. दरम्यान, त्याने भारतीय पासपोर्ट बाळगून असतानाच वानुआतू (Vanuatu) देशाचा पासपोर्ट मिळवल्याचा बनाव केला होता आणि २८ जून २०२२ रोजी त्याने भारतीय नागरिकत्व सोडल्याचा दावा विशेष न्यायालयासमोर केला होता.
तथापि, भारतासोबतच्या वाटाघाटी आणि विशेष न्यायालयाच्या माध्यमातून सुलतानोर ऑफ ओमानकडे (Sultana of Oman) भारताच्या प्रत्यार्पण अर्जानुसार कायदेशीर कारवाई तीव्र करण्यात आली. मस्कत येथील अपिल न्यायालयाने ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले. भारताच्या दूतावासाने तो अजूनही भारतीय नागरिक असल्याची पुष्टी केल्यानंतर न्यायालयाने त्याचे नागरिकत्वाचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बनावट प्रवास कागदपत्रांच्या आधारे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने, जी अशा प्रकरणांमध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करते, त्याला ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी मस्कतवरून भारतात आणले. ओमानच्या प्रशासनाचे या संपूर्ण मोहिमेतील सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत ईडीने जवळपास १९० ठिकाणी छापे टाकले असून, सुमारे २,००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त किंवा सील केली आहे. तसेच सध्या सुमारे ३,५00 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली आहे, ज्यामध्ये दुबईमधील २२ अचल मालमत्तांसह सुमारे १,८00 कोटी रुपयांची संपत्ती परदेशातील आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११६ आरोपींविरुद्ध सहा अभियोग तक्रारी (Prosecution Complaints) दाखल करण्यात आल्या असून, सौरभ चंद्राकर हा या प्रकरणातील अटक करण्यात आलेला पंधरावा व्यक्ती ठरला आहे.
तपासादरम्यान असे उघडकीस आले की, दुबई मुख्यालयातील पॅनऑपरेटर्सपासून ते हवाला हाताळणारे आणि शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपर्यंत पैशांच्या प्रवासाचा (Follow the money) सखोल माग काढण्यात आला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये दुबईमधील कंपन्यांकडे असलेली सुमारे २३६ कोटी रुपयांची सेक्युरिटीज गोठवण्यात आली होती. याशिवाय, जुलै २०२६ मध्ये ईडीने विकास गर्ग नावाच्या व्यक्तीला अटक केली, ज्याच्या कंपन्यांना बेटिंगमधून सुमारे ९४० कोटी रुपये मिळाले होते. यातील सुमारे ७६६ कोटी रुपयांचा निधी युनायटेड स्टेट्समधील 'एबिक्स इंक' (Ebix Inc.) या कंपनीच्या अधिग्रहणासाठी वापरण्यात आला होता. या प्रकरणातही ईडीने सुमारे ९४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
विशेष लक्षवेधी बाब म्हणजे, फेब्रुवारी २०२३ मध्ये रसल अल खैमाह (Ras Al Khaimah) येथे पार पडलेल्या सौरभ चंद्राकरच्या विवाहाला रोख स्वरूपात सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, ज्यासाठी नागपूरहून तीन चार्टर्ड विमाने मागवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या इव्हेंट कंपनी, हॉटेल्स आणि अंगडिया पेढ्यांच्या माध्यमातून ईडीने या पैशांचा मागोवा घेतला असून, तेथून जप्त केलेल्या पाहुण्यांच्या यादीवरून या सिंडिकेटच्या व्यवस्थापनाची नावे उघड झाली आहेत. सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या सौरभ चंद्राकरची त्याच्या सहकाऱ्यांचे जबाब, डिजिटल डेटा, परदेशी संस्थांशी संबंधित कागदपत्रे आणि मनी लाँडरिंगचा गुन्हा घडल्याच्या पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी केली जात आहे. या आंतरराष्ट्रीय सट्टेबाजी आणि गैरव्यवहार प्रकरणाचा व्याम विस्तृत असून यापुढील तपास वेगाने सुरू आहे.


