नाल्लकोंड-खांडेपार येथे भरदिवसा चोरी; १५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
13th November, 11:36 pm
नाल्लकोंड-खांडेपार येथे भरदिवसा चोरी; १५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

फोंडा : नाल्लकोंड-खांडेपार येथील लोकवस्तीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या देविदास नाईक यांच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याचे गुरुवारी उशिरा उघडकीस आले. घरात कोणीच नसताना मागच्या बाजूने प्रवेश करून सुमारे १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे संपूर्ण खांडेपार भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाल्लकोंड-खांडेपार येथील रहिवासी देविदास नाईक यांच्या घरातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे आपापल्या कामानिमित्त घराबाहेर गेले होते. देविदास यांची पत्नी गोमेकॉत तर मुलगा महाविद्यालयात गेला होता. घर बंद असल्याची संधी साधून चोरांनी घरात प्रवेश केला. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास देविदास नाईक कामावरून घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे आणि कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि कपाटातील सुमारे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरांनी घरात प्रवेश करून कपाटातील सर्व सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली आहे. तसेच मुख्य दरवाजाला आतून कडी घातल्याने घर मालक संध्याकाळी परतल्यानंतर उघडकीस आले. फोंडा पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने तपासणी केली. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा
सर्व पहा