पणजी : गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएससी) राज्य सरकारच्या विविध खात्यांतील ४४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. १३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रांतील प्राध्यापक, सरकारी अभियोक्ता तसेच प्रशासकीय पदांचा समावेश आहे.
अभियोक्ता संचालनालयात सर्वाधिक २० सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची (एपीपी) पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ११ खुल्या प्रवर्गासाठी, २ अनुसूचित जमातींसाठी, ६ इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आणि १ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव आहे. यापैकी एक पद अंधत्व आणि अल्पदृष्टी असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य खात्याच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती होणार आहे. यामध्ये सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील प्रतिनियुक्तीवरील बदलीद्वारे भरले जाणारे एक प्राध्यापक पद, विविध वैद्यकीय शाखांतील ७ व्याख्याता पदे, फिजिओथेरपीतील एक व्याख्याता आणि बालशल्यचिकित्सा विभागातील ३ सहाय्यक प्राध्यापक पदांचा समावेश आहे.
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण खात्यात २ सहाय्यक संचालक आणि १ उपसंचालक अशी एकूण ३ पदे भरली जाणार आहेत.
तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातही भरती होणार आहे. यांत्रिकी, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार आणि धातुशास्त्र अभियांत्रिकी विभागांत ७ सहाय्यक प्राध्यापक पदे भरली जाणार आहेत. विज्ञान व मानवविद्या विभागातील रसायनशास्त्राचे एक सहाय्यक प्राध्यापक पद, तसेच विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान विभागांतील ३ सहयोगी प्राध्यापक पदांचाही यात समावेश आहे.
सामान्य भरतीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर आहे. प्रतिनियुक्तीद्वारे बदलीच्या पदांसाठी २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील.
थेट भरतीच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असून, सरकारी नियमांनुसार वयात सवलत लागू असेल. सर्व पदांसाठी कोकणीचे ज्ञान अनिवार्य आहे, तर मराठीचे ज्ञान ही ऐच्छिक पात्रता म्हणून नमूद करण्यात आले आहे.
सीबीईएस पोर्टलवर ऑनलाईन अर्जाची सुविधा
उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा गोवा सरकारच्या सीबीईएस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. अर्जाचे शुल्क डिजिटल पद्धतीने किंवा ई-चलनाद्वारे गोव्यातील कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत भरता येईल. अंतिम मुदतीनंतर शुल्क भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित पदांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत तपासून घ्यावी, असा सल्लाही आयोगाने दिला आहे.


