पणजी : करमळी परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीला चपलेने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने जुने गोवे पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २७ वर्षीय संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ ध्रुव (वय २७, मूळ रा. छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तक्रारीनुसार, संशयित आणि अल्पवयीन युवती यांच्यात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयिताने युवतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पीडित मुलीने जुने गोवे पोलिसांत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर धुळापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.


