बांधकाम प्रकल्पांना परवाने देण्यापूर्वी जलसुरक्षा तपासणे आवश्यक : राज्यपाल

राज्यात कोणत्याही प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यापूर्वी त्यामुळे त्याभागातील जल सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले. (Pusapati Ashok Gajapathi Raju Governor Goa).

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
14th November, 12:22 pm
बांधकाम प्रकल्पांना परवाने देण्यापूर्वी जलसुरक्षा तपासणे आवश्यक : राज्यपाल

पणजी : यंदाच्या मान्सूनमध्ये देशात १३ टक्के तर राज्यात ३१ टक्क्यांची तूट आहे. भविष्यात पाण्यासाठी केवळ मान्सूनवर अवलंबून राहता येणार नाही. पाणी वाचवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या पाहिजेत. राज्यात कोणत्याही प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यापूर्वी त्यामुळे त्याभागातील जल सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले. (Pusapati Ashok Gajapathi Raju Governor Goa). 

‘जल व्यवस्थापन दि गोवा राऊंड टेबल’ या कार्यक्माच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, डॉ. राजीव कुमार, जे पी सिंग, निवृत्त कॅप्टन यामिनी चौधरी व इतरांची उपस्थिती होती.

राज्यपाल म्हणाले की, यंदा गोव्यात मागील १०८ वर्षांतील सर्वात कमी मान्सूनच्या पावसाची नोंद झाली आहे. ही बाब नक्कीच काळजीची आहे. भविष्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले पाहिजेत. तळे तसेच अन्य पाणथळ जागांवर अतिक्रमण, प्रदूषण थांबले पाहिजे. उद्योग, पर्यटन, रस्ते, गृह प्रकल्प अथवा अन्य कोणत्याही नवीन बांधकाम प्रकल्पांना जलसंवर्धन करणे बंधनकारक केले पाहिजे.

पावसाचे पाणी साठवण्याबाबत जागृती हवी

पावसाचे पाणी साठवण्याबाबत जागृती झाली पाहिजे. याबाबत गोव्यात असलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, त्याचा पुनर्वापर करण्यासाठी एकात्मिक धोरण राबवावे लागेल.
ते म्हणाले, गोव्याचे डोंगर, जंगले आणि नैसर्गिक झरे हे जलस्रोतांचे मुख्य कणा आहेत. लॅटराइट खडकांमधून पाझरणारे पाणी भूजल पातळी वाढवते.

नैसर्गिक पाण्याचा वारसा जपणे गरजेचे

राज्यातील नैसर्गिक पाण्याचा वारसा जपणे गरजेचे आहे. बागांची कामे, कार धुणे आणि फ्लशिंगसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर न करता प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरले जावे. विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून जलसंवर्धनाच्या नवीन पद्धती शोधून काढल्या जाव्यात.  जलसंवर्धनाला विकासाच्या तत्त्वज्ञानाचा भाग बनवले पाहिजे. जलव्यवस्थापन ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे.
उन्हाळ्यात राज्यात कोणालाही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, अशी जलसुरक्षित आणि शाश्वत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
फॉग हार्वेस्टिंग तंत्रज्ञान
राज्यपालांनी सांगितले की, गोवा विद्यापीठ आणि एनआयआटी यांच्या समन्वयाने गोव्यात 'फॉग नेट प्रोजेक्ट'  राबवला जात आहे. या प्रयोगाद्वारे हवेतील बाष्पाचे थेंब जाळीच्या साहाय्याने गोडे पाणी म्हणून गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा
सर्व पहा